श्रीमंत वीर सुभेदार मल्हारराव होळकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रीमंत वीर सुभेदार मल्हारराव होळकर यांनी शौर्य, धैर्य आणि मुत्सद्देगिरीच्या बळावर मराठा साम्राज्याचा झेंडा अटकेपार फडकविण्यात अग्रणी भूमिका बजावली. त्यांचा जन्म जेजुरीजवळ होळ या गावी झाला. आपल्या पराक्रमाने, कसलीही घराणेशाहीची परंपरा नसताना स्वबळावर पुढे येऊन मराठेशाहीचे मुख्य आधारस्तंभ बनले. मल्हाररावांनी दाभाड्यांचे एक सरदार कंठाजी कदमबांडे यांच्यासह आपली कारकीर्द सुरू केली. शिपाईगिरी करत असताना तरुण बाजीराव पेशव्यांबरोबर त्यांची खास मैत्री जुळून आली आणि आपल्या पराक्रमाच्या जोरावर 1729च्या सुमारास त्यांना माळवा प्रांताची सुभेदारी मिळवली. मराठी साम्राज्य वाढवण्याच्या कामी त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले आणि मराठी साम्राज्याच्या सीमा सिंधू नदीपर्यंत वाढवल्या. इंदूरच्या होळकर घराण्याचे ते संस्थापक होत. आपल्या संपूर्ण हयातीत त्यांनी चार पेशव्यांची कारकीर्द पाहिली. पेशव्यांच्या घरात त्यांना वडीलकीचा मान होता. अहिल्यादेवींनी त्यांच्या पश्चात आलमपूरचे नाव बदलून मल्हारनगर ठेवले आणि तेथे त्यांची छत्री उभी केली. मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील आलमपूर येथील ही समाधी मराठाकालीन शिल्पकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण मानले जाते.