
अजित पवार यांचे निधन होऊन आज पाच महिने पूर्ण झाले. त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांनी खुले पत्र लिहिले आहे. अजित दादांची आठवण काढत अजित दादांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असती असे म्हटले आहे.
पत्रात रोहित पवारांनी म्हटले आहे की, प्रिय अजितदादा… त्या दुर्देवी घटनेला आज बघता बघता पाच महिने झाले. काळ कुणासाठी थांबत नाही, पण असा एकही दिवस गेला नाही, ज्या दिवशी तुमची आठवण या महाराष्ट्राने काढली नाही. नुकतंच रेवतीचं लग्न झालं… लग्नात सगळ्यांनीच तुम्हाला खूप मीस केलं.. मामा म्हणून तुमची अनुपस्थिती तर सर्वांनाच चटका लावणारी होती. लग्नात ‘जल्लोष’ होता पण तुमच्या नसण्याने ‘जान’ मिसिंग होती. जयच्या लग्नात तुम्ही केलेली धम्माल सर्वांना आठवली. तशीच धम्माल आणि तोच थाट, तोच रुबाब आम्हाला रेवतीच्या लग्नातही बघायला मिळाला असता तर किती भारी वाटलं असतं, किती आनंद झाला असता ! असे रोहित पवार म्हणाले.
तसेच दुष्काळाच्या उंबरठ्यावर असलेल्या महाराष्ट्रातील अन्नदाता आज मोठ्या चिंतेत आहे. तुम्ही मातीतले ऑर्ग्यानिक नेते होतात… मातीत राबणाऱ्या हाताची आणि कष्टाची तुम्हाला जाणीव होती.. तुम्ही असतात तर या सरकारप्रमाणे फसवी कर्जमाफी केली नसती आणि अन्नदात्याच्या तोंडाला पानंही पुसली नसती. तुम्ही असता तर शेतकऱ्यांना असं फसवलं गेलं नसतं आणि अन्नदात्यासाठी मलाही रस्त्यावर उतरावं लागलं नसतं. म्हणूनच तुमची उणीव आम्हा सर्वांना आणि शेतकऱ्यांना प्रकर्षाने पदोपदी जाणवतेय. दादा, तुम्ही ‘शब्दाचा पक्का’ होतात.. पण हा ‘पक्का शब्दही’ आज हरवलाय. तुमच्या अपघाताच्या चौकशीचा तुमच्याच सरकारने भर सभागृहात दिलेला शब्दही आज पूर्ण होत नाहीय, हे खेदानं बोलावं लागतंय. पण आम्ही मात्र लढत आहोत आणि शेवटपर्यंत लढत राहू, हा तुम्हाला माझा शब्द आहे, असेही रोहित पवार म्हणाले.
नुकत्याच सुरु झालेल्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ९७ हजार कोटीच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या आणि पुन्हा तुमची आठवण आली. तुम्ही असतात तर अवघ्या तीन महिन्यांत बजेटचा असा बट्ट्याबोळ नक्कीच झाला नसता. आज दरोज राज्यात जे काही चाललंय ते तर उघड्या डोळ्यांनी पहावंसंही वाटत नाही… ‘राजकारण लै वंगाळ असतं’ या तुमच्या वाक्याची तर सातत्याने सर्वांनाच जाणीव होतेय. म्हणूनच म्हणतो दादा…. तुम्ही असाल तिथून उठा आणि नेहमीच्या स्टाईलने झपझप पावलं टाकत तडक पुन्हा आमच्यात या… प्रत्येक भाषणात तुम्ही ‘माझा महाराष्ट्र’ म्हणायचात ना.. मग या तुमच्या महाराष्ट्राच्या विकासाची गतीही तुमची वाट पाहताना थांबलीय. तिची पावलंही मंदावलीय… म्हणून म्हणतो अजितदादा ही गती वाढवण्यासाठी तरी परत या.. अजितदादा परत या..MISS U दादा..! असेही रोहित पवार यांनी नमूद केले आहे.























































