
मुंबई महापालिका मुख्यालयासमोर जिमखान्याच्या जागेवर आधुनिक सोयीसुविधांसह नवीन भव्य सभागृह साकारण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधींची वाढती संख्या आणि सध्याच्या सोयीसुविधांचा अभाव लक्षात घेता, हे अत्याधुनिक सभागृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चार मजली इमारतीमध्ये पार्किंगची सोय व ३५० आसनांची व्यवस्था असलेला आराखडा तयार करण्यात आला असून, नवीन सभागृहाला ऐतिहासिक लूक देण्यात येणार आहे. हा प्रस्ताव लवकरच स्थायी समितीकडे मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे.
महापालिकेच्या ऐतिहासिक ब्रिटिशकालीन सभागृहातील जागा अपुरी पडत असल्याने, पालिका प्रशासनाने आझाद मैदानालगतच्या जिमखाना परिसरात ३५० आसनक्षमतेचे अत्याधुनिक सभागृह उभारण्याचे योजले आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात करण्याचे नियोजन असून, त्याचा अंतिम आराखडा महापालिकेने तयार केला आहे. यापूर्वी याच ठिकाणी टाऊन हॉल व जिमखाना उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र, तो स्थायी समितीने फेटाळल्यानंतर, सुधारित आराखड्यात त्याच जागेवर आधुनिक महापालिका सभागृह उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
नवीन इमारतीतील अत्याधुनिक सुविधा
चार मजली इमारतीच्या तळमजल्यावर क्रीडा संकुल आणि पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. पहिल्या मजल्यावर नगरसेवक, आयुक्त, सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेत्यांची दालने असतील. सर्वात वरच्या मजल्यावर ३५० आसनक्षमतेचे प्रशस्त सभागृह उभारण्यात येणार असून, त्यामध्ये नगरसेवक, अधिकारी आणि पत्रकारांसाठी स्वतंत्र आसनव्यवस्था असणार आहे. पालिका मुख्यालयातून नवीन सभागृहात थेट जाता यावे, यासाठी दोन्ही इमारतींना जोडणारा ‘स्कायब्रिज’ उभारण्यात येणार आहे.



























































