
तमाम शिवभक्त आणि पर्यटकांसाठी खूशखबर आहे. किल्ले रायगडावर शासकीय रोप वे सुरू करण्यास अखेर मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे लवकरच अवघ्या 100 रुपयांत रोप वेने पायथ्यापासून रायगडाचा माथा गाठता येणार आहे.
रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. रायगडावर सध्या खासगी रोप वे कार्यरत आहे. त्यासाठी एका व्यक्तीला 350 रुपये भाडे आकारले जाते. तो रोप वे सर्वांनाच परवडत नाही. बहुतांश पर्यटक पायरीमार्गानेच रायगड चढून जातात.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी तसेच शिवराज्याभिषेकाचा सोहळा पाहण्यासाठी, त्यात सहभागी होण्यासाठी हजारो लोक रायगडावर येतात. तेथील राजसदर, बाजारपेठ, गंगासागर, हिरकणी बुरूज, टकमक टोक अशी ठिकाणे पाहून इतिहास जागा होतो. त्यांच्यासाठी शासकीय रोप वेची व्यवस्था व्हावी यासाठी 2018 पासून संभाजीराजे छत्रपती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून दिल्ली येथील पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करीत होते. अखेर पुरातत्व विभागाने रोप वेसाठी मान्यता दिली असल्याचे संभाजीराजे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
संवर्धन साहित्याची वाहतूकही निःशुल्क होणार
रायगडावर जतन आणि संवर्धनाचे कामही सुरू आहे. त्यासाठी खासगी रोप वेने सामान वर नेण्यासाठीच कोटय़वधी रुपये खर्च होत आहेत. प्रति किलो 6.30 रुपये आकारले जात आहेत. शासकीय रोप वे झाल्यास त्या सामानाची वाहतूक नाममात्र दरात किंवा निःशुल्कही करता येणार आहे. त्यामुळे कोटय़वधी रुपयांची बचत होणार आहे, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.




























































