
समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असून, आज अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात एक भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत चंद्रपूर येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. हे कुटुंब चंद्रपूरहून अमरावतीच्या दिशेने येत असताना ही दुर्घटना घडली.
जिवने कुटुंबीय कारने समृद्धी महामार्गावरून प्रवास करत होते. धामणगाव रेल्वे जवळील ‘चेनेज क्रमांक १०५’ परिसरात रस्त्याच्या कडेला एक कंटेनर उभा होता. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगातील कार थेट उभ्या कंटेनरच्या मागील बाजूस जाऊन धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा समोरील भाग पूर्णपणे कंटेनरमध्ये घुसला आणि गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला.
या अपघातात खालील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. भास्कर महादेव जिवने (वय ६५) महादेव जिवाजी जिवने (वय ४३) लताबाई महादेव जिवने (वय ६०) आरती भास्कर जिवने (वय ४१) जिज्ञा भास्कर जिवने (वय १२), हे सर्वजण चंद्रपूर शहरातील शासकीय डी.एड. महाविद्यालयामागील बाबुपेठ (बहुपेठ) परिसरातील रहिवासी होते.
घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस, महामार्ग पोलीस आणि जिल्हा वाहतूक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य राबवण्यात आले, मात्र अपघात इतका भयंकर होता की कोणाचाही जीव वाचू शकला नाही. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस पुढील तपास करत आहेत. या दुर्दैवी घटनेची माहिती चंद्रपुरात पोहोचताच जिवने कुटुंबीयांच्या नातेवाईकांवर आणि संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.




























































