
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या शिफारशींनुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून सर्व संलग्न शाळांमध्ये त्रिभाषा सूत्राच्याअंमलबजावणीसाठी सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे सोमवारी जाहीर केली आहेत. या नव्या धोरणातून दहावीच्या विद्यमान बॅचला वगळण्यात आले असून, त्यांना हा नवा नियम लागू होणार नसल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सध्या दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
सीबीएसईने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, सध्या इयत्ता सातवी, आठवी आणि नववीत शिकत असलेल्या ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वीच दोन परदेशी भाषांची निवड केली आहे, त्यांना तोच पर्याय पुढे सुरू ठेवण्याची परवानगी दिली जाणार आहे. मात्र त्यांना त्यासोबत एक अतिरिक्त स्थानिक हिंदुस्थानी भाषा शिकणे अनिवार्य असणार आहे. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी योग्य ती अभ्यास सामग्री आणि संसाधने ठराविक वेळेत उपलब्ध करून दिली जातील, असे सीबीएसईने म्हटले आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार, शालेय शिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांनी तीन भाषा शिकणे आवश्यक असून, त्यापैकी किमान दोन भाषा या मूळ हिंदुस्थानी असाव्यात, अशी शिफारस करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमध्ये बहुभाषिकत्व रुजवणे, हिंदुस्थानी भाषांमधील प्राविण्य वाढवणे आणि सर्वसमावेशक शिक्षणाला चालना देणे हा यामागील मुख्य उद्देश आहे, असे सीबीएसईने म्हटले आहे.

























































