
अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठे विधान केले आहे. इराणने स्वतःहून बैठकीची विनंती केली असून, त्यांना आमच्याशी चर्चा करायची आहे, असा दावा ट्रम्प यांनी सोशल मीडियावर केला आहे. ही महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी कतारची राजधानी दोहा येथे पार पडणार आहे. आज तकने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
व्हाईट हाऊसने जारी केलेल्या निवेदनानुसार, अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर हे दोहा येथे होणाऱ्या या बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीत उच्चस्तरीय चर्चेसोबतच तांत्रिक पातळीवरील चर्चाही होणार असल्याचे व्हाईट हाऊसने स्पष्ट केले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची शांतता प्रक्रिया पुढे नेण्याची इच्छा असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.
मंगळवारी होणाऱ्या या बैठकीपूर्वी वॉशिंग्टन आणि तेहरान यांनी लष्करी कारवाया थांबवण्यावर सहमती दर्शवल्याची माहिती अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. दोन्ही देशांनी सध्या सर्व लष्करी कारवाया थांबवण्याचा निर्णय घेतला असून, तूर्तास एक पाऊल मागे घेण्यावर एकमत झाले आहे. जोपर्यंत तांत्रिक पातळीवरील चर्चा सुरू आहे, तोपर्यंत समुद्रातून जहाजांची वाहतूक कोणत्याही अडथळ्याविना सुरू राहील, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

























































