टीईटी परीक्षा ऑनलाईन, पेपरफुटीचा तपास एसआयटीकडे मकोका लावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘टीईटी’ पेपरफुटी प्रकरणाचा तपास ‘एसआयटी’कडे सोपवण्यात आला असून हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार असल्याने संबंधित आरोपीवर ‘मकोका’ लावण्यासाठी कायदेशीर प्रकिया करण्यात येणार आहे. यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत दिली. पुढील वर्षापासून टीईटी परीक्षा ऑनलाईन घेतल्या जातील, अशी घोषणाही त्यांनी केली.

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी प्रकरणावरून विधान परिषद आणि विधानसभेत विरोधकांनी आज सरकारला धारेवर धरले. टीईटी पेपरफुटी प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी तसेच शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी परिषदेत लावून धरली. या पेपरफुटीवर नियम 289 अंतर्गत तातडीने चर्चा घडवून आणण्याची मागणी शिवसेनेसह विरोधी पक्षांच्या आमदारांनी केली. परंतु सभापती राम शिंदे यांनी ही मागणी फेटाळल्यामुळे विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे झालेल्या गोंधळामुळे सभागृहाचे काम अर्धा तास तहकूब करण्यात आले. तर विधानसभेचे कामकाज सुरू होताच शिवसेनेचे गटनेते भास्कर जाधव यांनी टीईटीच्या प्रश्नावर स्थगन प्रस्तावाची मागणी केली. सर्व कामकाज बाजूला ठेवत यावर चर्चा घडवून आणण्याची मागणी केली. परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेण्यास सरकार वारंवार अपयशी का ठरत आहे याचे उत्तर सरकारने महाराष्ट्राला द्यावे, असे काँगेसचे विजय वडट्टेटीवार म्हणाले. विधान परिषदेत आमदार सतेज पाटील म्हणाले की, सरकार 13 कोटी जनतेच्या विकासाच्या घोषणा करते; मात्र सात लाख उमेदवारांची परीक्षादेखील व्यवस्थित घेऊ शकत नाही.

दादा भुसे यांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे

महाराष्ट्रातील शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटीच्या गंभीर प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, काँग्रेसची विद्यार्थी संघटना नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) ने आज विधान भवन परिसरात शिक्षणमंत्री दादा भुसे यांची गाडी अडवून त्यांना काळे झेंडे दाखवले. यावेळी कार्यकर्त्यांनी शिक्षणमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

विधिमंडळात महाविकास आघाडी आक्रमक

टीईटी पेपरफुटी प्रकरणी आज विधानसभा आणि विधान परिषदेत महाविकास आघाडीने आवाज उठवत दिवसभराचे कामकाज बाजूला ठेवून चर्चा करण्याची मागणी केली होती. मात्र चर्चा नाकारण्यात आल्याने विधान परिषदेत गदारोळ झाला. त्यामुळे सभागृह अर्धा तास तहकूब करण्यात आले. तर विधानसभेत महाविकास आघाडीने सभात्याग केला.

  • टीईटीची फेरपरीक्षा पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात घेतली जाईल. फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. शिवाय पुढील वर्षापासून टीईटी आणि इतर परीक्षा
    ऑनलाइन पद्धतीने घेण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचा आराखडा तयार केला जाईल, असे उत्तर मंत्री दादा भुसे यांनी दिले.
  • या पेपरफुटी प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता तसेच स्पर्धा परीक्षा आणि परीक्षांमधील गैरप्रकार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे. तपासासाठी बिहार, हरयाणा आणि दिल्ली येथे स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहेत.