
पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्स दौऱयावरून परतल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाच्या हालचालींना वेग आला आहे. कोणत्याही क्षणी हा फेरबदल केला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी फेरबदल केला जाणार आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची दाट शक्यता आहे.
पंतप्रधान मोदी आज सेशेल्स दौऱयावरून परतले. त्यानंतर त्यांनी लगेच उद्या मंगळवारी सर्व विभागांच्या सचिवांची बैठक बोलावली आहे. सर्व सचिवांना त्यांच्या संबंधित मंत्रालयाबाबत सादरीकरण करण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर ते पक्षाच्या नेत्यांसोबत मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जॉर्ज कुरियन यांनी राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. याशिवाय रवनीतसिंग बिट्टू यांना राज्यसभेवर संधी देण्यात आलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना पंजाबच्या आगामी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांनाही मंत्रिमंडळातून वगळण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी नव्या चेहऱयाला संधी मिळू शकते. याशिवाय बी. एल. वर्मा यांचाही कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपणार आहे. त्यामुळे त्यांच्याबाबतदेखील चर्चा होऊ शकते.
तीन राज्यपालांबाबतही लवकरच निर्णय
कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, मध्य प्रदेशचे मांगूभाई पटेल आणि उत्तराखंडचे ले. जन. गुरमीत सिंग यांचा कार्यकाळ पुढील काही महिन्यांमध्ये संपणार आहे. मंत्रिमंडळातून वगळण्यात आलेल्या काही सदस्यांना या राज्यांमध्ये राज्यपाल म्हणून नियुक्त केले जाऊ शकते.






























































