मुंबईत आजपासून एसआयआर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई शहर आणि उपनगरांत उद्यापासून मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी भेट देणार आहेत. मतदारांनी बीएलओंना आवश्यक माहिती उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

एसआयआर अंतर्गत बीएलओ अधिकारी मतदारांना त्यांचा गणना अर्ज देतील. या अर्जामध्ये आवश्यक माहिती भरून स्वाक्षरी करून त्याची एक प्रत बीएलओंना परत द्यावी लागेल. त्याआधी शक्य झाल्यास मतदारांनी https://voters.eci.gov.in या संकेतस्थळावर किंवा EC Net App वर यापूर्वीच्या एसआयआरमधील आपला किंवा आईवडिलांचा तपशील (नाव, मतदारसंघ, मतदार यादी भाग क्रमांक., अनुक्रमांक) शोधून ठेवावा. जर मागील एसआयआरमध्ये आईवडिलांचे नाव नसेल तर गणना अर्जासोबत ओळखीच्या पुराव्याची कागदपत्रे आणि पासपोर्ट आकारातील फोटो द्यावा.

अडचणी आल्यास काय करावे

एसआयआर प्रक्रियेबाबत मतदारांना कोणतीही अडचण किंवा शंका असल्यास नजीकच्या मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाशी किंवा 1800 22 1850 या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी केले आहे.

ओळखीच्या पुराव्यासाठी कागदपत्रे

मागील एसआयआरमध्ये नाव नसेल तर नवीन नोंदणीसाठी ओळखीचा पुरावा द्यावा लागेल. यासाठी जन्माचा दाखला, पासपोर्ट, इयत्ता दहावीचे किंवा शैक्षणिक प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, सरकारी किंवा सार्वजनिक उपक्रम क्षेत्रातील कर्मचारी/निवृत्तीवेतन ओळखपत्र, राज्य / स्थानिक प्राधिकरणाची कुटुंब नोंदवही, शासनाने दिलेले जमीन किंवा घरवाटप प्रमाणपत्र, राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा पुरावा; बँक, टपाल कार्यालय, आधारकार्ड यापैकी कोणताही एक पुरावा तयार ठेवावा. तसेच नुकतेच काढलेले पासपोर्ट आकारातील छायाचित्र सोबत ठेवणे आवश्यक आहे.