
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी शिवसेना सोडून शिंदे गटात प्रवेश केलेल्या आमदार सचिन अहिर यांचा आज समाचार घेतला. शिवसेनेने दिलेल्या पदांचा उल्लेख करतच आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला. ‘सर्व काही दिले तरी अजून काय पाहिजे होते? काय ओरबाडायचे होते? रोज तुमच्या आरत्या करायला हव्या होत्या का?’ असा टोला त्यांनी लगावला.
आदित्य ठाकरे यांनी विधान भवन आवारात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सचिन अहिर यांनी शिंदे गटात प्रवेश करून विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असे पत्रकारांनी त्यांना विचारले. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘गेली चार वर्षे पाहतोय. जे जवळचे लोक आहेत, ज्यांना सर्व काही मिळतेय तेच स्वतःच्या स्वार्थासाठी निघून जातात. वरळी आणि शिवडी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेनेचे तिथले काम बोलते. त्यामुळे कुणी आले, कुणी गेले तरी शिवसेनेला धक्का बसत नाही. पण दुर्दैव हेच की ज्यांना शिवसेनेने सगळे काही दिले तरी त्यांना अजून काय पाहिजेय?’ असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.
सचिन अहिर यांच्या नावाचा उल्लेख न करता आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, ‘ही एकच व्यक्ती आहे जी सतत माझ्यासोबत असायची. शिवसेनेने त्यांना काहीच कमी पडू दिलेले नाही. इतर बोलतात तसे ‘भेटत नव्हतो’ असेही नाही. रोज येता-जाताना भेटायचे. रोज माझ्यासोबत फोटो आहेत. मग अजून काय करायचे तुमच्यासाठी?’ कुणी दुसरीकडे गेल्याने शिवसेनेला काहीही फरक पडत नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
कारवाई केल्याशिवाय राहणार नाही
शिवसेना सोडली तरी पुढे वरळीतून लढणार नाही असा मेसेज सचिन अहिर यांनी आपल्याला सकाळी पाठवला. पण या केवळ सांगायच्या गोष्टी असतात, असे आदित्य ठाकरे म्हणाले. पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत कारवाई होऊ शकते का, असे पत्रकारांनी विचारले असता, जी काही योग्य कारवाई होईल ती केल्याशिवाय शिवसेना राहणार नाही, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.
उपसभापतीपदी भाजपचा कार्यकर्ता का नाही, उपरा का बसवला?
भाजपने राम मंदिर बनवू असे म्हणत असंख्य कार्यकर्त्यांना त्यांनी रस्त्यावर आणले, शिवसैनिकही त्या आंदोलनात होते. भाजपने देशात दंगली घडवून आणल्या तेच आज राम मंदिर लुटत आहेत. आज एकच प्रश्न पडतो की, उपसभापतीपदी भाजपचा कार्यकर्ता का नाही बसवला? जे घरदार सोडून भाजपसाठी काम करताहेत, वर्षानुवर्षे प्रचार करताहेत त्यांना बाजूला ठेवून तुम्ही उपरे त्यांच्या डोक्यावर बसवताय? का त्यांना सत्तेपासून दूर ठेवले जातेय? की भाजपमध्ये टॅलेंट नाही? अशी प्रश्नांची सरबत्ती आदित्य ठाकरे यांनी केली.
जे गेलेत त्यांना हाच प्रश्न आहे की जे आपली मंदिरे लुटत आहेत, अयोध्येत ज्यांनी जमीन घोटाळा केला. उज्जैनमध्ये ज्यांनी जमीन घोटाळा केला. अशी हिंदू मंदिरे लुटणाऱ्यांबरोबर तुम्ही कसे बसू शकता? जे दोन तृतीयांश बहुमत जमा करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलू इच्छित आहेत त्यांच्यासोबत कसे बसू शकता? हे ‘ऑपरेशन टायगर’ मुळीच नाही, हे ‘ऑपरेशन देवेंद्र फडणवीस’ आहे.
































































