
कोपरगाव नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांचे अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अहिल्यानगर यांनी रद्द करण्याचा आदेश दिला आहे. या निर्णयामुळे कोपरगावच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, त्यांच्या नगरसेवकपद व उपनगराध्यक्षपदाबाबत पुढील कायदेशीर प्रक्रिया काय होणार, याकडे लक्ष लागले आहे.
सन 2025 मध्ये झालेल्या कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 9 (अ) हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव होता. या प्रभागातून निवडणूक लढविताना जितेंद्र रणशूर यांनी सादर केलेल्या जात प्रमाणपत्राबाबत आक्षेप घेत कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सागर आहेर यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती. समितीने संबंधित कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर उपलब्ध नोंदी व पुराव्यांच्या आधारे रणशूर यांचे अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा आदेश दिला आहे.
तक्रारदार सागर आहेर यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, त्यांच्या वतीने ऍड. मुन्ना सय्यद यांनी समितीसमोर बाजू मांडली होती. या निर्णयामुळे नगरपरिषदेतील पुढील प्रशासकीय आणि कायदेशीर घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या प्रकरणाबाबत उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपली भूमिका लवकरच मांडू, असे सांगितले.
प्रमाणपत्र जमा करण्याचे आदेश
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षा मोनिका सिंह, सदस्य राकेश पाटील आणि सदस्य सचिव अनिल तिदमे यांनी दिलेल्या आदेशानुसार, संबंधित जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. तसेच त्या प्रमाणपत्राच्या आधारे मिळालेले शासकीय अथवा निमशासकीय लाभ नियमानुसार तपासून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित जात प्रमाणपत्र उपविभागीय अधिकारी, शिर्डी यांच्याकडे जमा करण्याचेही आदेश समितीने दिले आहेत.





























































