
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या महत्त्वाच्या कुंभार्ली घाटात मुसळधार पावसामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. घाटातील एका अतिधोकादायक वळणावर सुमारे 20 फूट रस्ता खचला असून, रस्त्याखालची मातीही सरकू लागल्याने हा भाग वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या चार दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका कुंभार्ली घाटालाही बसला आहे. खचलेल्या रस्त्यामुळे अवजड वाहने, एसटी बस तसेच अन्य वाहनांची वाहतूक मोठ्या जोखमीची बनली असून, संबंधित ठिकाणी वाहनचालकांना अत्यंत सावधगिरीने प्रवास करावा लागत आहे. यापूर्वीही घाटातील काही धोकादायक वळणांवर कायमस्वरूपी संरक्षक भिंती उभारण्याऐवजी केवळ पिंपे ठेवून तात्पुरती सुरक्षितता करण्यात आल्याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. पावसाळ्यापूर्वी आवश्यक दुरुस्ती आणि संरक्षणात्मक उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोपही स्थानिकांकडून होत आहे.
दरम्यान, संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने या ठिकाणी कायमस्वरूपी संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात, खचलेला रस्ता त्वरित दुरुस्त करावा आणि आवश्यक तेथे वाहतूक नियंत्रणाची प्रभावी व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिक आणि वाहनचालकांकडून होत आहे.





























































