
गुहागर येथील कासव संरक्षक आणि गोल्डनमॅन विश्वास महादेव खरे यांचा खून करून १० तोळे सोन्याची चेन चोरून नेणाऱ्या दोन आरोपींना चिपळूण सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी.बी.म्हालटकर यांनी जन्मठेपची शिक्षा सुनावली आहे. तब्बल १२ वर्षांनंतर हा निकाल लागला आहे.
१ ऑक्टोबर २०१४ रोजी गुहागर येथील खेर प्लेझर पॉईंट होम स्टे येथे आलेल्या दोन पर्यटकांनी विश्वास खरे यांचा विळा व सुराच्या साहाय्याने २१ गंभीर वार करत मान कापून खून केला होता. खरे यांच्या गळ्यातील १० तोळ्यांची चेन चोरून नेली होती. तीन महिन्यानंतर रत्नागिरी पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. सरकारी वकील प्रफुल साळवी यांनी सर्वप्रथम खेड सत्र न्यायालय आणि नंतर चिपळूण सत्र न्यायालयात भक्कम बाजू मांडली होती. या प्रकरणात ५१ साक्षीदार तपासले गेले. त्यामध्ये काही साक्षीदार फुटीर झाले. आरोपी अमोल चंद्रकांत गाढवे आणि किरण रामदास कुचेकर (दोघेही रा.पुणे) हे घटनेच्या दिवशी गुहागरात होते आणि नंतर पुण्यात गेले, हे मोबाईल सीडीआर वरून सिद्ध झाले.
आरोपी गाढवे याने सोनाराला चैन विकली हे सिद्ध झाले. सत्र न्यायाधीश डी. बी. म्हालटकर यांनी आरोपी अमोल गाढवे आणि किरण कुचेकर यांना कलम ३०२ खून, कलम ३९४ चोरीसह ३४ भादवि अन्वये जन्मठेप आणि १ हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.




























































