आमिर खान पुन्हा दिसणार नव्या भूमिकेत, आशुतोष गोवारीकर सोबत 25 वर्षांनंतर एकत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान पुन्हा एकदा दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्यासोबत काम करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. ‘लगान’नंतर तब्बल 25 वर्षांनी ही लोकप्रिय जोडी नव्या स्पोर्ट्स ड्रामासाठी एकत्र येणार असल्याचे वृत्त आहे. या चित्रपटाचे संभाव्य नाव ‘लालकार’ असे असल्याची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट भारताचे पहिले कसोटी क्रिकेट शतकवीर लाला अमरनाथ यांच्या आयुष्यावर आधारित असेल. त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीसोबतच 1947 च्या भारत-पाकिस्तान फाळणीच्या पार्श्वभूमीवरील घटनाही कथेत महत्त्वाची भूमिका बजावतील. चित्रपटाचे चित्रीकरण ऑक्टोबर 2026 मध्ये सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी आमिर खानचे नाव निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. इतर कलाकारांची निवड अद्याप सुरू असून, लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. चित्रपटाची निर्मिती एक्सेल एंटरटेनमेंटकडून केली जाणार असून, पटकथा राजकुमार हिरानी आणि अभिजात जोशी यांनी लिहिल्याचे वृत्त आहे. ‘लालकार’ हे नाव ऐकून अनेकांना ‘लगान’ची आठवण होत असली, तरी हा चित्रपट पूर्णपणे वेगळी कथा मांडणार असल्याचे सांगितले जात आहे. क्रिकेट हा समान धागा असला तरी या चित्रपटात ऐतिहासिक आणि भावनिक पैलूंना अधिक महत्त्व दिले जाणार आहे. असे वृत्त टीव्ही 9 ने दिले आहे.

दरम्यान, आमिर खान सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. गौरी स्प्रॅटसोबत लग्न करण्याची तयारी सुरू असल्याचे त्याने नुकतेच स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर ‘3 इडियट्स 2’सह त्याच्या इतर प्रकल्पांबाबतही विविध चर्चा सुरू आहेत. मात्र, ‘लालकार’बाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे चित्रपटाचे नाव, कथानक आणि कलाकारांबाबतची माहिती सध्या मीडिया रिपोर्ट्सवर आधारित असून, निर्मात्यांच्या अधिकृत घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.