
अयोध्येतील राम मंदिरासाठी भाविकांनी दिलेल्या देणग्यांमध्ये कथित गैरव्यवहार झाल्याच्या वादावरून आम आदमी पक्षाचे (AAP) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी भारतीय जनता पक्ष आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर जोरदार टीका केली. हा कथित गैरव्यवहार आताचा नसून 2021 पासूनच सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
पत्रकार परिषदेत बोलताना केजरीवाल म्हणाले की, राम मंदिरासाठी जमिनींच्या खरेदीत मोठा घोटाळा झाला. 2 कोटी रुपयांची जमीन अवघ्या 10 मिनिटांत 18 कोटी रुपयांना ट्रस्टला विकण्यात आली. त्याचप्रमाणे 3 कोटी रुपयांची जमीन 24 कोटी, 9 कोटी रुपयांची जमीन 55 कोटी आणि 14 कोटी रुपयांची जमीन 95 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली. या सर्व व्यवहारांची कागदपत्रे सार्वजनिक क्षेत्रात उपलब्ध असल्याचा दावा त्यांनी केला.
मंदिराच्या बांधकामासाठी देण्यात आलेल्या कंत्राटांमध्येही मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. मंदिराचे बांधकाम सुरू झाल्यानंतर प्रत्येक निविदेवर 40 टक्के कमिशन घेतल्याचे अभियंत्यांनी सांगितल्याचे वृत्त आहे. अशा प्रकारे देवाचीही फसवणूक करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
राम मंदिरात भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या मौल्यवान वस्तूही गायब झाल्याचा दावा करत केजरीवाल म्हणाले की, प्रभू श्रीरामांचा हार, पादुका, दागिने, भाविकांनी अर्पण केलेले हिरे-जडजवाहीर, चांदीच्या विटा, चांदीचे दिवे तसेच रोख देणग्याही चोरीला गेल्याच्या बातम्या समोर येत आहेत. यामुळे देशभरातील भाविकांच्या श्रद्धेला मोठा धक्का बसत असल्याचे त्यांनी सांगितले.
गोव्यातील नागरिकांचा उल्लेख करताना केजरीवाल म्हणाले की, गोव्यातील हिंदू आणि सनातनी समाजाने राम मंदिराच्या उभारणीसाठी मोठ्या श्रद्धेने देणग्या दिल्या होत्या. मात्र आता मंदिरातील कथित घोटाळे आणि देणग्यांच्या गैरव्यवहाराच्या बातम्या समोर येत असल्याने गोव्यातील प्रत्येक सनातनी नागरिकाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी त्यांनी केली.





























































