
विद्यापीठाच्या तांत्रिक अडचणी व त्रुटींमुळे एलएलबी अभ्यासक्रमाच्या निकालात शून्य गुण मिळालेले २९ विद्यार्थी अखेर उत्तीर्ण झाले आहेत. युवासेनेने केलेल्या पाठपुराव्यामुळे हे यश मिळाले असून अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनी तत्काळ सिनेट सदस्यांना संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
एल.एल.बी. अभ्यासक्रमातील सेमिस्टर ६च्या जाहीर केलेल्या निकालात विद्यापीठाने घोळ घालून २९ विद्यार्थ्यांना थेट ‘शून्य’ गुण दिले होते. हा केवळ तांत्रिक दोष नसून विद्यापीठाच्या गलथानपणाचा हा कळस असल्याचा आरोप करत युवासेनेने प्रशासनाला धारेवर धरले होते. मागील पाच सत्रांमध्ये उत्तम गुण मिळाले होते, त्यांनी एल.एल.एम. सीईटी परीक्षेत चमक दाखवली, अशा हुशार विद्यार्थ्यांना सहाव्या सत्राच्या निकालात ‘शून्य’ गुण कसे मिळू शकतात, असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. शून्य गुण मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची फेरतपासणी करण्यात यावी. तसेच जोपर्यंत सुधारित निकाल येत नाही तोपर्यंत एल.एल.एम. प्रवेश प्रक्रिया सुरू करू नये, अशी मागणी युवासेनेने विद्यापीठाकडे केली होती.
विद्यार्थ्यांना आवाहन
विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणी केली असता २९पैकी २८
विद्यार्थ्यांचे गुण वाढून ते उत्तीर्ण झाले आहेत. तसेच एका विद्यार्थ्याला ९ गुण देण्यात आले होते त्याचे ५३ गुण मिळाले आहेत. या यशानंतर ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले आहेत त्यांनी शिवसेना भवन, चौथा मजला येथील सिनेट सदस्य कार्यलयात संपर्क साधण्याचे आवाहन युवासेनेने केले आहे.






























































