
मशिदीवरील भोंग्यामुळे होणाऱया ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून कारवाई करण्यास कुचराई केल्याच्या याचिकाकर्त्यांच्या दाव्यानंतर उच्च न्यायालयाने शुक्रवारी सरकारला फैलावर घेतले. मशिदींवरील भोंगे, अन्य प्रार्थनास्थळांतील किंवा कार्यक्रमांतील कानठळ्या वाजवणारे लाऊडस्पीकरविरोधात तक्रारी आल्यानंतर पोलिसांकडून किती वेळात आणि नेमकी काय कारवाई केली जाते, अशी विचारणा हायकोर्टाने शुक्रवारी सरकारला केली. तसेच याबाबत दोन आठवडय़ांत सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश सरकारला दिले.
कांदिवलीच्या ठाकूर व्हिलेज येथे राहणाऱ्या ऍड. रीना रिचर्ड यांनी ध्वनी प्रदूषणासंदर्भात समता नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. मात्र त्याची दखल घेतली न गेल्याने त्यांनी याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.






























































