चेंबूर येथील स्कूल बस दुर्घटनाप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करा; शिवसेना आक्रमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चेंबूर येथे शाळेच्या बसवर झाड कोसळून 11 वर्षीय विहानचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणाची दखल घेत आज शिवसेना नेते–खासदार अनिल देसाई यांनी महापालिका मुख्यालयावर धडक देत संताप व्यक्त केला. हा केवळ अपघात नसून प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा बळी असल्याचा आरोप करत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी देसाई यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे केली.

अनिल देसाई यांनी मृत विद्यार्थी विहानच्या पालकांची भेट घेऊन शोक व्यक्त केला. त्यासोबतच त्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सर्वच पालकांच्या भावना तीव्र होत्या. त्यावरून अनिल देसाई यांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरले. त्यांनी आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेऊन दुर्घटनेची उच्चस्तरीय व सखोल चौकशी करण्याची मागणी केली. या प्रकरणात कर्तव्यात कसूर केलेले संबंधित महापालिका अधिकारी, वृक्ष अधिकारी आणि संबंधित पंत्राटदार यांच्यावर उत्तरदायित्व निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, विभागप्रमुख प्रमोद शिंदे, सचिव व नगरसेवक साईनाथ दुर्गे, सुप्रदा फातर्पेकर, मीनाक्षी पाटणकर, स्नेहल शिवकर, रमाकांत रहाटे, गीतेश राऊत, रोहिणी कांबळे, लक्ष्मी भाटिया तसेच स्थानिक शिवसेना पदाधिकारी  महेंद्र नाकटे, निमिष भोसले, प्रशांत म्हात्रे, शेखर चव्हाण, दीपेश चव्हाण, राजेश दौंडकर, उमेश करकेरा व पदाधिकारी उपस्थित होते.

अश्विनी भिडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत घटनेला जबाबदार असणाऱयांची गय केली जाणार नसून चौकशी अधिकारी नेमून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी तज्ञांच्या सल्ल्याने उपाययोजना करणार असल्याचे सांगितले.