
अवघ्या चार दिवसांवर आलेल्या आषाढी वारीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी अलंकापुरीत दाखल होत असतानाच पवित्र इंद्रायणी मात्र पुन्हा फेसाळली आहे. सभोवतालच्या रसायनमिश्रित सांडपाण्यामुळे ही परिस्थिती निर्माण होत असताना प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने वारकरी-भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, या प्रदूषित पाण्यातच लाखो वारकऱ्यांना पवित्र इंद्रायणी स्नान करावे लागणार आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करूनही इंद्रायणीची दयनीय अवस्था झाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
माउलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला अवघे काही दिवस उरले आहेत. ज्ञानोबा तुकोबांच्या गजराने दुमदुमणाऱ्या आळंदीत वारकऱ्यांच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात आहे. दुसरीकडे प्रशासकीय अनास्थेमुळे ‘वारकऱ्यांच्या स्वागताला फेसळलेली इंद्रायणी’ असे संतापजनक चित्र निर्माण झाले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका, आळंदी नगरपरिषद हद्दीतून थेट रसायन आणि मैलामिश्रित सांडपाणी नदीत सोडले जात असल्याने नदीतील पाण्यावर पांढरा फेस आला आहे. इंद्रायणी घाटाची तोडफोड करून घाट विद्रूप करण्यात आला आहे, तरीही प्रशासन याकडे डोळेझाक करत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. इंद्रायणी प्रदूषणमुक्त करण्यासाठी विविध सेवाभावी संस्थानी पाठपुरावा करून शासनाचे लक्ष वेधले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची भावना जोग महाराज प्रासादिक दिंडीचे मार्गदर्शक हभप विचारसागर महाराज लाहुडकर यांनी व्यक्त केली आहे. नदी प्रदूषण रोखण्याची मागणी देहू रानजाई प्रकल्पाचे प्रमुख सोमनाथ आबा, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, आळंदी जनहित फाऊंडेशन अध्यक्ष राजेंद्र घुंडरे-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्याकडे केली आहे.
तत्कालीन बांधकाम अभियंता सचिन गायकवाड यांनी घाट पूर्ववत केला जाईल, अशी ग्वाही दिली होती. मात्र, प्रत्यक्षात विकासकामे मार्गी न लागल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
आळंदी नगरपरिषदेच्या माध्यमातून परिसरात विकासकामे सुरू आहेत. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून थेट सांडपाणी नदीत येत आहे. तसेच पावसाला सुरुवात झाल्याने जलपर्णी पाण्यातून वाहून येत आहे. आळंदी येथील घाटावरील जलपर्णी हटविण्याचे काम सुरू आहे.
– माधव खांडेकर, मुख्याधिकारी, आळंदी नगरपरिषद



























































