
मुसळधार पावसामुळे कोसळणारी झाडे आणि विजेचे शॉर्टसर्किट यामुळे ठाणे आणि भाईंदरमध्ये दोन मुलांचे बळी गेले.
मुंब्य्रात पावसाच्या पाण्यात उतरलेल्या एका १६ वर्षीय तरुणीला विजेचा धक्का लागून तिचा जागीच मृत्यू झाला. आलिया चांदीवाला असे या दुर्दैवी तरुणीचे नाव आहे. दुसऱ्या घटनेत भाईंदर-उत्तन रस्त्यावर पावसाच्या माऱ्याने नारळाचे झाड उन्मळून ते एका बाईकस्वारावर कोसळले. या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला. राहुल पाटील असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
आलिया चांदीवाला
मुंब्यातील कादर पॅलेस या परिसरात आलिया चांदीवाला ही तरुणी राहते. ती इमारतीतून बाहेर पडली. साचलेल्या पाण्यातून ती जात असतानाच तिला विजेचा धक्का लागला. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांविरोधात निष्काळजीपणा आणि मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
भाईंदर-उत्तन या मुख्य रस्त्यावर राहुल पाटील हा तरुण दुचाकीने प्रवास करत होता. सदानंदनगर येथील मुर्धा पालिका कार्यालयाजवळ त्याची बाईक येताच नारळाचे मोठे झाड त्याच्या अंगावर कोसळले. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्याच्या मानेला व मणक्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर तातडीने रुग्णालयात शस्त्रक्रियाही करण्यात आली. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. राहुल हा मुर्धा गावातील माजी नगरसेवक, माजी उपनगराध्यक्ष अशोक पाटील यांचा मुलगा आहे.
बदलापुरात खड्ड्याने घेतला महिलेचा जीव
गणपतीचे दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या महिलेचा खड्धात दुचाकी आदळून मृत्यू झाल्याची घटना बदलापूरच्या जांभळे गावाजवळ घडली आहे. अरुणा कुलकर्णी असे अपघातात बळी गेलेल्या महिलेचे नाव आहे. कल्याणच्या एकवीरानगरमध्ये राहणाऱ्या अरुणा कुलकर्णी या मुलगा प्रतीकसह दुचाकीवरून टिटवाळा येथे गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेल्या होत्या. दर्शन घेऊन घरी परतत असताना जांभळे गावाजवळ अचानक खड्डा आल्याने प्रतीकचे नियंत्रण सुटले आणि गाडी खड्ड्यात आदळली. या अपघातात अरुणा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.




























































