गद्दारीलाही मर्यादा असते… हिंमत असेल तर भाजपात जा; मला थांबवायचे असेल तर मला संपवावे लागेल! ममता कडाडल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आमदार-खासदार सोडून गेल्यामुळे ममता बॅनर्जींचे राजकारण संपल्याचा दावा करणाऱया फुटिरांना आणि भारतीय जनता पक्षाला तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी आज जोरदार आवाज दिला. ‘मला थांबवायचे असेल तर तुम्हाला मला संपवावे लागेल’, असे ममतांनी ठणकावले. ‘गद्दारीलाही एक मर्यादा असते. हिंमत असेल तर गद्दारांनी भाजपमध्ये प्रवेश करावा आणि माझ्याशी दोन हात करावेत’, असे आव्हानच त्यांनी दिले.

विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून तृणमूल काँग्रेसला गळती लागली आहे. आधी 58 आमदार आणि त्यानंतर 20 खासदारांनी ममतांची साथ सोडून स्वतंत्र गट स्थापन केला. फुटीर आमदारांच्या गटाने पक्ष आणि चिन्हावर दावा केला. दोन दिवसांपूर्वीच या गटाने तृणमूलचे कोलकाता येथील मुख्यालय बळकावले. या पार्श्वभूमीवर ममतांनी फेसबुक व्हिडिओ शेअर करत गद्दारांवर तोफ डागली.

‘ज्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक जिंकली, ज्या पक्षाने राजकीय ओळख दिली, त्याच तृणमूल काँग्रेसच्या अस्तित्वावर काही लोक उठले आहेत. पक्षाचा विश्वासघात करत आहेत. पण गद्दारीलाही एक मर्यादा असते. भाजपच्या इशाऱयावरून हे गद्दार माझ्याशी व माझ्या पक्षाशी राजकीय डावपेच खेळत आहेत. हिंमत असेल तर भाजपमध्ये जा आणि माझ्याशी दोन हात करा,’ असे ममता कडाडल्या.

‘व्हॅनिश कुमार’ही माझा आवाज दाबू शकत नाहीत!

‘मला पक्षाच्या चिन्हाची पर्वा नाही. ते माझ्याकडून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. ते चिन्ह गळ्यात अडकवून मी लोकांपर्यंत जाईन. पक्षाचे चिन्ह हिरावून घेण्यासाठी त्यांनी ‘व्हॅनिश कुमार’चा वापर केला, तरीही ते माझा आवाज दाबू शकणार नाहीत,’ असे म्हणत त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना टोला हाणला.

21 जुलैला सभा घेणारच!

21 जुलै रोजी शहीद दिवस रॅली काढण्याची घोषणा तृणमूल काँग्रेसने केली आहे. प्रशासनाने अद्याप त्यास परवानगी दिलेली नाही. मात्र, ममता रॅली काढण्यावर ठाम आहेत. ही रॅली निघणारच, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘व्यक्ती सोडून गेली म्हणून कोणतीही संस्था अस्तित्वहीन होत नसते,’ असेही त्यांनी सुनावले.

स्वतःला बंडखोर म्हणवून घेता. निवडणुकीच्या आधी तुमच्यातली ही बंडखोरी कुठं गेली होती? पक्षाच्या तिकिटावर निवडणुका लढून आमदार, खासदार झालात, मंत्री झालात, सरकारी पदं भोगलीत तेव्हा तुमची नाराजी कुठं होती? तेव्हा समोर का आला नाहीत?