
झिम्बाब्वेविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी बीसीसीआयने 15 सदस्यीय हिदुस्थानी संघाची घोषणा केली आहे. मात्र, या संघातून 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपचा हिरो संजू सॅमसनला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अवघ्या चार महिन्यांपूर्वी वर्ल्ड कपमध्ये चार डावात 321 धावा चोपून काढत ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ ठरलेल्या सॅमसनला विश्रांती देण्यात आली आहे की संघातून वगळण्यात आले आहे, याबाबत बीसीसीआयने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील या संघात 15 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने आपले स्थान कायम राखले आहे.
टीम इंडिया आणि झम्बाब्वे यांच्यामध्ये 23 जुलै पासून तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेल सुरुवात होईल. तर दुसरा आणि तिसरा टी-20 सामना 25 आणि 26 जुलै रोजी होणार असून सर्व सामने हरारे येथे खेळवले जाणार आहे. सध्या सुरू असलेल्या इंग्लंड दौऱ्यावरील संघाच्या तुलनेत या संघात अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. संजू सॅमसनसोबतच वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, रवी बिश्नोई आणि प्रसिद्ध कृष्णा यांनाही संघात स्थान मिळालेले नाही. तर दुसरीकडे, डावखुरा फलंदाज रिंकू सिंग, यष्टीरक्षक फलंदाज प्रभसिमरन सिंग, वेगवान गोलंदाज अशोक शर्मा, यश ठाकूर आणि डावखुरा फिरकीपटू हर्ष दुबे यांचे संघात पुनरागमन झाले आहे. आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा कुटणाऱ्या प्रभसिमरन सिंगला पहिल्यांदाच हिंदुस्तानी संघातून खेळण्याची संधी मिळाली आहे.
संजू सॅमसनला संघातून वगळल्यामुळे आता क्रिकेट वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आयपीएलनंतर खेळलेल्या तीन टी-20 सामन्यांत सॅमसनला अनुक्रमे 5, 0 आणि 1 अशा धावाच करता आल्या होत्या, ज्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात त्याच्या जागी युवा वैभव सूर्यवंशीला संधी देण्यात आली होती. हिदुस्थान आणि झिम्बाब्वे यांच्यातील आपआपसात भिडण्याचा रेकॉर्ड पाहता टीम इंडियाचे पारडे 11-3 असे जड आहे. झिम्बाब्वे दौरा हा सहसा युवा खेळाडूंना अजमावण्यासाठी वापरला जात असल्याने सॅमसनला वगळण्याचा निर्णय तात्पुरता असू शकतो, असाही अंदाज वर्तवला जात आहे.
🚨 News 🚨#TeamIndia squad announced for the 3️⃣-match T20I series against Zimbabwe.
More Details ▶️ https://t.co/sC19D5eW8y#ZIMvIND pic.twitter.com/ctbM5gFMtY
— BCCI (@BCCI) July 6, 2026
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी हिंदुस्थानी संघ:
श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा (उपकर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, रिंकू सिंग, हर्ष दुबे, वरुण चक्रवर्ती, प्रिन्स यादव, यश ठाकूर, अशोक शर्मा, मयांक यादव, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक).

























































