
मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने भाविकांना अत्यंत कळकळीचे आवाहन केले आहे की, सध्या आळंदीकडे प्रवास करू नका. ज्या ठिकाणी आहात, तेथेच अथवा सुरक्षित ठिकाणी थांबा, असे नम्र निवेदन संस्थानने प्रसिद्ध केले आहे. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारीची ओढ प्रत्येक वारकऱ्याच्या मनात असतानाच, सुरक्षेचा उपाय म्हणून संस्थानला हे पाऊल उचलावे लागले आहे.
महाराष्ट्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे श्रीक्षेत्र आळंदीतील इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, नदीवरील पूल तसेच शहरातील अनेक मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत संस्थानने निवेदनात म्हटले आहे की, “वारकरी संप्रदायाची वारी ही केवळ परंपरा नसून श्रद्धा, निष्ठा आणि भक्तीचा अखंड प्रवाह आहे. मात्र, सध्याची आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता प्रत्येक वारकऱ्याने स्वतःच्या आणि सहकाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे.”
दरम्यान, येत्या 8 जुलै रोजी दुपारी 3 वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरातून आषाढी वारी पालखी सोहळ्याचे नियोजित प्रस्थान होणार आहे. या प्रस्थान कार्यक्रमाबाबत संस्थानचे विश्वस्त आणि पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप यांच्यासह विश्वस्त मंडळ सातत्याने दिंडीप्रमुखांच्या संपर्कात असून, परिस्थितीनुसार आवश्यक सूचना त्यांना दिल्या जात आहेत. प्रत्येक वारकऱ्याने आपल्या दिंडीप्रमुखांच्या संपर्कात राहून त्यांच्या सूचनांचे पालन करावे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासन तसेच संस्थानला सहकार्य करावे, असे आवाहन करत ‘हा आषाढी सोहळा श्रद्धेइतकाच सुरक्षिततेचाही असावा’, असा संदेश संस्थानकडून देण्यात आला आहे.

























































