
विश्वाला ज्यांनी फुटबॉलचे धडे शिकवले त्याच ब्राझीलवर फिफा वर्ल्ड कपमध्ये नामुष्कीची वेळ आली. हा वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगलेले होते. पण ज्याच्यावर संपूर्ण संघ अवलंबून होता तो नेमार ज्युनियरच जायबंदी असल्याचा फटका संघाला बसला. त्यामुळे ब्राझीलचा नॉर्वेविरुद्धच्या सामन्यात स्वप्नभंग झाला. ब्राझीलविरुद्धच्या ऐतिहासिक विजयात दोन गोल झळकावत आर्ंलग हालांदने नॉर्वेला प्रथमच फिफा वर्ल्ड कपच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचवले.
अखेरच्या दहा मिनिटांत दोन गोल!
अवघ्या 25 वर्षीय आर्ंलग हालांदने अखेरच्या दहा मिनिटांत केलेल्या दोन गोलांच्या जोरावर पाच वेळच्या जगज्जेत्या ब्राझीलला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. बराच वेळ सामन्यात प्रभाव टाकता न आलेल्या हालांदला मध्यंतरानंतरच्या ‘कुलिंग ब्रेक’मध्ये प्रशिक्षक स्टेल सॉल्बॅक्कन यांनी अधिक आक्रमक होण्याचा सल्ला दिला. त्यानंतर हालांदने 79व्या मिनिटाला डोक्याने पहिला गोल केला आणि नियोजित वेळ संपण्यापूर्वी दुसरा गोल झळकावत नॉर्वेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
आता हालांदचा दबदबा
फुटबॉल विश्वात मागील अनेक वर्षांपासून लियोनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि किलियन एम्बाप्पे यांच्या नावांचेच गारूड होते. मात्र आता नॉर्वेची गोलमशीन असलेल्या हालांदने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. कारण या वर्ल्ड कपमध्ये त्याचा दबदबा पाहायला मिळाला.
हालांदकडून गोलरक्षकावर स्तुतिसुमने
हालांदच्या नावावर आता नॉर्वेकडून 54 सामन्यांत तब्बल 62 गोलांची नोंद झाली असून त्याचा प्रतिसामना 1.15 गोलांचा विलक्षण सरासरीचा विक्रम आहे. त्याच्या अचूक फिनिशिंगमुळे आणि शांत स्वभावामुळे त्याला ‘स्मायलिंग असॅसीन’ अशीही ओळख मिळाली आहे. गेल्या 14 सामन्यांत त्याने तब्बल 27 गोलांचा पाऊस पाडला आहे. सामनावीर पुरस्कार मिळूनही हालांदने विजयाचे खरे श्रेय गोलरक्षक ओर्जान नायलंड याला दिले. तो म्हणाला की, मी दोन गोल केले, पण माझ्यासाठी सामनावीर नायलंडच आहे. त्याने अनेक खात्रीशीर गोल रोखले. त्याच्यामुळेच आम्ही प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलो!



























































