
अयोध्येतील देणगी चोरी प्रकरणानंतर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने आज चंपत राय यांचा सरचिटणीस पदाचा, तर अनिल मिश्रा यांचा विश्वस्त पदाचा राजीनामा स्वीकारला. चंपत राय यांच्या जागेवर महाराष्ट्र कॅडरचे सेवानिवृत्त वन अधिकारी कृष्ण मोहन यांची कार्यवाहक सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
देणगी चोरी प्रकरण उघडकीस आल्यानंतर ट्रस्टची आज पहिली बैठक झाली. सुमारे तीन तास ट्रस्टची बैठक चालली. राजीनामा दिल्यानंतर तो मंजूर करणे हे ट्रस्टच्या घटनेत लिहिलेले आहे, त्यामुळे राजीनामा मंजूर करण्यात आला, अशी माहिती विश्वस्त के. पाराशरन यांनी दिली. ट्रस्टची पुढील बैठक आता २२ जुलै रोजी होणार आहे. दरम्यान, भाविकांनी अर्पण केलेले रामायण, पादुका यांसारख्या २,८०० वस्तूंची ट्रस्टकडे नोंद असल्याचा दावा कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी यांनी केला.


























































