
जम्मू कश्मिरमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळत असून, राज्यात मान्सूनने रौद्र रूप धारण केले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागांत अचानक पूर आणि दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. डोडा जिल्ह्यातील थाथरी उपविभागात आलेल्या अचानक पुरामुळे घरे, वाहने, दुकाने आणि इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तर डोडा-किश्तवार महामार्गाचेही नुकसान झाल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.
रात्रभर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे स्थानिक ओढे आणि नाल्यांना पूर आला. पुराचे पाणी वेगाने थाथरी बाजारपेठेत शिरल्याने संपूर्ण परिसर जलमय झाला. पाण्यासोबत मोठे दगड, चिखल आणि कचरा वाहत आल्याने अनेक घरे आणि दुकाने बाधित झाली. रस्त्यांवर उभ्या असलेल्या वाहनांचेही मोठे नुकसान झाले. असे वृत्त एनडीटीव्ही ने दिले आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पूर इतक्या वेगाने आला की अनेकांना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धावपळ करावी लागली. प्रशासनाने नुकसानीचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून मदत आणि पुनर्वसनाचे काम सुरू आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे आलेल्या फ्लॅश फ्लडमुळे डोडा-किश्तवार महामार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल, दगड आणि मातीचा ढिगारा साचला आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्याचा काही भाग वाहून गेल्याने प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने या मार्गावरील वाहतूक बंद केली आहे.
किश्तवाड जिल्ह्यात 540 मेगावॅट क्षमतेच्या निर्माणाधीन क्वार जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्याजवळ मोठी दरड कोसळली. यामुळे चिखलाचा प्रवाह निर्माण झाला असून परिसरातील कामांवरही परिणाम झाला आहे.
हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार जम्मू-काश्मीरमधील संवेदनशील भागांत पुढील काही दिवस मुसळधार पाऊस, वादळी वारे, अचानक पूर आणि दरडी कोसळण्याचा धोका कायम आहे. त्यामुळे नद्या, ओढे आणि डोंगर उताराजवळील भाग टाळण्याचे तसेच नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.




























































