
मुंबई-अहमदाबाद मार्गावरील महालक्ष्मी उड्डाणपुलावर आज पुन्हा एकदा आरपार खड्डा पडला आहे. केवळ चार दिवसांपूर्वीच तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. पण ही दुरुस्ती तकलादू ठरली असून कोणत्याही क्षणी अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे.
चार दिवसांपूर्वी पडलेल्या खड्ड्यातून लोखंडी गज बाहेर आल्याने सुमारे १५ ते २० वाहनांचे टायर पंक्चर झाले होते. त्यानंतर महामार्ग प्राधिकरणाने तात्पुरत्या स्वरूपात सिमेंट काँक्रीट टाकून दुरुस्ती केली होती. मात्र ही दुरुस्ती निकृष्ट ठरली. उड्डाणपुलावर घातलेला काँक्रीटचा थर निखळून उड्डाणपुलाखाली कोसळला असून पुलावर पुन्हा आरपार खड्डा निर्माण झाला आहे. त्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वाहतूक बंद केली
घटनेची माहिती मिळताच कासा पोलीस ठाण्याचे अधिकारी अमर पाटील यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन उड्डाणपुलावरील वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले. दरम्यान महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी सुहास चिटणीस यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित ठेकेदाराला तातडीने घटनास्थळी जाऊन वाहतूक बंद करण्यास तसेच खड्ड्याची योग्य व दर्जेदार पद्धतीने दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले. त्यामुळे आता कायमस्वरूपी आणि दर्जेदार दुरुस्ती कधी होणार, याकडे वाहनचालकांचे लक्ष लागले आहे.




























































