मुसळधार पावसामुळे भरकटलेले जहाज मुंबईच्या किनाऱ्यावर, मनोरी समुद्रकिनाऱ्याजवळ तटरक्षक दल दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाचा तडाका वाढला असून सर्वत्र जनजीवन विस्कळीत झालेले असताना आता या मुसळधार पावसाचा फटका एका विदेशी जहाजाला बसला आहे. अतिवेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे हे विदेशी जहाज भरकटून मुंबईच्या मनोरी समुद्रकिनाऱ्यावर येऊन पोहचले. याबाबत गोराई पोलिसांकडून माहिती मिळताच तटरक्षक दल तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आहे.

 

मनोरी येथील समुद्रकिनाऱ्यावर एक भरकटलेले जहाज दिसून आले. माहिती मिळताच गोराई पोलिसांना तात्काळ समुद्रकिनारी धाव घेतली. जहाज समुद्रकिनाऱ्यापासून काही अंतरावर असून मुसळधार पाऊस आणि वाऱ्याचा वेग अधिक असल्याने जहाज हेलकावे खाताना दिसत आहे. दरम्यान, पोलिसांनी या घटनेची माहिती तटरक्षक दलाला दिली असून तटरक्षक दलाची टीम मनोरी समुद्रकिनारी दाखल झाली आहे.

 

सध्या समुद्रात ताशी ८० ते ९० किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. तसेच समुद्रकिनारा खडकाळ असल्याने लहान बोटींच्या सहाय्याने जहाजाजवळ जाणे धोकादायक ठरू शकते, असे स्थानिक मच्छीमारांचे म्हणणे आहे. त्यामुळे मदतकार्यात अडचणी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने करडी नजर
तीव्र वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे समुद्रही खवळलेल्या स्थितीत आहे. तसेच पावसाचा जोर अधिक असल्याने समुद्रातील दृश्यमानता कमी झाली आहे. वाऱ्याच्या वेगाने आणि वादळी पावसामुळे हे जहाज भरकटून मनोरी किनाऱ्याजवळ आले असावे, असा प्राथमिक अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, तटरक्षक दलाकडून सुरक्षेच्या दृष्टीने या जहाजावर ड्रोनच्या मदतीने करडी नजर ठेवण्यात आली आहे.