
मुंबईत होत असलेल्या मुसळधार पावसाने महायुती सरकारच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल केली. मुंबईकडे येणाऱ्या रस्त्यांवर पाणी साचण्याबरोबरच विविध दुर्घटनांमुळे वाहतूक विस्कळीत झाल्याने बहुतांश आमदार मुंबईत पोहोचू शकले नाहीत. परिणामी दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. विधानसभेत विरोधी पक्षाच्या आमदारांनी मुंबईच्या विविध भागांमध्ये तसेच मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर घडलेल्या दुर्घटनेवरून सरकारला धारेवर धरले.
मुंबईसह राज्यातील दुर्घटनांची चौकशी करा – विजय वडेट्टीवार
मुंबईसह महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक दुर्दैवी घटना घडल्या असून निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. मुंबईत मॅनहोलमध्ये पडून, झाडे कोसळून तसेच मानखुर्द येथे इमारत कोसळून अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत गेल्या दोन दिवसांत 12 जणांचा जीव गेला आहे, असे सांगतानाच, मुंबईसह राज्यात घडलेल्या दुर्घटनांची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
विधानसभेचे कामकाज सुरू होताच वडेट्टीवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला. मुसळधार पावसामुळे घडलेल्या घटनांनी प्रशासनाचे पावसाळापूर्व नियोजन आणि आपत्ती व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण, झाडांची छाटणी, मॅनहोलची सुरक्षितता, जलनिस्सारण व्यवस्था आणि आपत्कालीन नियोजन प्रभावीपणे झाले असते, तर अनेक नागरिकांचे प्राण वाचले असते, असे वडेट्टीवार म्हणाले.
हा केवळ दुर्घटनेचा नाही तर मुंबई महापालिकेच्या जबाबदारीचाही प्रश्न आहे. मॅनहोल उघडे पडलेत त्याची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. धोकादायक व अतिधोकादायक वस्त्या आहेत तिथे पावसाळापूर्व नियोजन करायला हवे होते. पण काहीच केलेले दिसत नाही. मिसिंग लिंकवर कोट्यवधी खर्च केले, त्यावर पहिल्याच पावसात खड्डे पडलेत. मुंबई-पुणे महामार्ग बंद पडला आहे. सरकारने यावर निवेदन करावे आणि मुंबईसह राज्यात घडलेल्या सर्व घटनांची उच्चस्तरीय चौकशी करावी, असे वडेट्टीवार म्हणाले.
मुंबईतील सिमेंटच्या रस्त्यांना तडे कसे गेले, चौकशी करा – अजय चौधरी
मुंबईतील रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले गेले. परंतु त्या नव्या रस्त्यांना पावसामुळे तडे गेले आहेत. त्याची सरकारने तातडीने चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी केली. गेल्या चार दिवसांत झाडे कोसळण्याचे प्रमाण मोठे आहे. अनेक झाडांची पावसाळ्यापूर्वी छाटणी केली गेली नाही. त्यामुळे सोसाट्याच्या वाऱ्यात झाडे कोसळून मृत्यू होत आहेत. ते रोखण्यासाठी धोकादायक झाडांची तातडीने छाटणी करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्तांना द्यावेत, असेही अजय चौधरी म्हणाले.
मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाखांची मदत द्या – अमिन पटेल
मुंबईत पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमधील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदत सरकारने द्यावी अशी मागणी कॉंग्रेस आमदार अमिन पटेल यांनी केली. पावसाने महापालिकेचे अपयश समोर आले आहे त्याची सरकारने दखल घ्यावी. दुर्घटनांमुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी कडक पावले उचलली गेली नाहीत तर मृतांचा आकडा शेकड्यांवर जाण्याची भीती आहे. सरकारने तातडीने उपाययोजना करून हे मृत्यूचे तांडव थांबवावे, असे अमिन पटेल म्हणाले.
मुंबई व आसपासच्या परिसरात तुफान पावसामुळे अनेक दुर्घटना घडल्या. रविवारी एकाच दिवसात या दुर्घटनांमध्ये 13 लोकांचा बळी गेला. महाविकास आघाडीच्या आमदारांनी त्याच्या निषेधार्थ सोमवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले.
सखोल चौकशी करू – गिरीष महाजन
अतिवृष्टीमुळे दरडी कोसळणे ही नैसर्गिक आपत्ती असून, ज्या ठिकाणी बोगदे, रस्ते किंवा इतर ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत, त्या सर्व घटनांची चौकशी केली जाईल, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांनी विधान परिषदेत दिली. राज्यभरात, तसेच मुंबई महानगरपालिकेकडून आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. झाडांच्या छाटणीसह धोकादायक ठिकाणांवर मनुष्यबळ तैनात करण्यात आले असून, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य यंत्रणा सतर्क आहेत, असेही त्यांनी सांगितले.




























































