महाबळेश्वरमध्ये विक्रमी पाऊस! ढगफुटीसारखा बरसला, 24 तासांत 510 मिमिची नोंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई, कोकणसह राज्यात आता पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. अनेक ठिकाणची पाणीटंचाईची समस्या कमी झाली आहे. तसेच काही धरणेही भरली आहे. पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस होत आहे. सातारा जिल्ह्यात गेल्या 24 तासांत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरमध्ये गेल्या 24 तासांत तब्बल 513 मिलिमीटर म्हणजेच 20 इंच इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.

गेल्या 24 तासातील पावसाने सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील डोंगरी भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. महाबळेश्वरमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले असून, ठिकठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. अनेक रस्ते खचले, झाडे उन्मळून पडली, वीजपुरवठा खंडित झाला आणि अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. महाबळेश्वरमध्ये झालेली 510 मिलिमीटर पावसाची नोंद ही सातारा जिल्ह्यातील आतापर्यंतच्या सर्वाधिक पावसाची नोद आहे. या विक्रमी पावसामुळे प्रशासन सतर्क झाले असून, नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

खंडाळा तालुक्यातील अतिट गावात रात्रभर झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे डोंगरातून आलेल्या पाण्यामुळे ओढ्या-नाल्यांना पूर आला आहे. पूर आलेल्या ओढ्या काठच्या काही घरांमध्ये पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये शेतीचे काही प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने नुकसानीचे पंचनामे करून ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे.