
पाकिस्तानमधून ड्रोनव्दारे अंमली पदार्थांची तस्करी करणार्या एका सराईत गुन्हेगाराला नांदेडमध्ये रविवारी अटक करण्यात आली असून, त्याला पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ९ मे २०२६ रोजी मध्यरात्री पंजाब राज्यातील उत्तर धारीवाल जिल्ह्यात पंजाबचे क्युआरटी पथक गस्त घालत असताना त्यांना सीमेपलीकडून अर्थात पाकिस्तानातून एक संशयास्पद ड्रोन निदर्शनास आले. क्युआरटीच्या पथकाने याबाबत धारीवाल जिल्ह्यात तत्परता दाखवत सदरचे ड्रोन खाली पाडले. या ड्रोनच्या माध्यमातून हिंदुस्थानच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाची तस्करी केली जात असल्याचा संशय पंजाब पोलिसांना होता.
या ड्रोनची पाहणी केली असता त्यात एकूण ११.७६० किलो वजनाचे अंमली पदार्थ सापडले. हे अंमली पदार्थ छोट्या छोट्या दहा पाकिटामध्ये विभागले होते. हे ड्रोन जेव्हा खाली उतरले, त्याठिकाणी आरोपी जुगराजसिंह उर्फ गोलू किकरसिंह हा त्याठिकाणी आला. पोलीस त्याच्या मागावर होते. मात्र, अंधाराचा फायदा घेत आरोपी पळाला. पंजाब पोलिसांनी त्याची चारचाकी गाडी जप्त केली होती. गेल्या दोन महिन्यापासून या आरोपीचा शोध सुरु होता.
पंजाब पोलिसांना तपासादरम्यान आरोपी नांदेडमध्ये लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पंजाबचे सहायक पोलीस निरीक्षक सत्यपालसिंह यांच्या नेतृत्वाखाली पंजाब पोलिसांचे पथक ४ जुलै रोजी नांदेडला पोहचले. त्यांनी नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ.निलाभ रोहन यांची भेट घेवून सविस्तर माहिती दिली. त्यानंतर अत्यंत गोपनिय पध्दतीने निलाभ रोहन यांनी एक खास पथक नेमले. व आरोपीवर पाळत ठेवली. पोलिसांनी सापळा रचून रविवारी जुगराजसिंहला ताब्यात घेतले. तो मुळच्या पंजाबच्या पोलीस ठाणे सराई हद्दीतील रहिवाशी असल्याचे तपासात उघडकीस आले. ५ जुलै रोजी नांदेड पोलिसांच्या मदतीने त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर नांदेडच्या न्यायालयाने त्याची तीन दिवसाची प्रवास कोठडी मंजूर केली. त्यानंतर पंजाब पोलीस आरोपीला घेवून पुढील तपासासाठी पंजाबकडे रवाना झाले.
नांदेडात सलग तीन दिवस त्याचे वास्तव्य होते. मात्र पंजाब पोलीस आणि नांदेड पोलिसांनी संयुक्तपणे त्याच्यावर पाळत ठेवत अखेर त्यास अटक केली. पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांनी सदरच्या प्रकरणात महत्वाची भूमिका बजावली. एका आंतरराष्ट्रीय रॅकेटमधील आरोपीला नांदेडात अटक झाल्याने पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी डॉ.निलाभ रोहन यांचे अभिनंदन केले आहे.






























































