
दापोली तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आंजर्ले येथील कोपरीआळी परिसरात अपघातांची मालिका सुरूच आहे. एसटी बसला बाजू देत असताना एक कार रस्त्यालगतच्या गटारात घसरल्याची घटना नुकतीच घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
विशेष म्हणजे, याच ठिकाणी सलग दुसऱ्या दिवशी अशाच प्रकारचा अपघात घडल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मुसळधार पावसामुळे येथील ‘बँक ऑफ इंडिया’समोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, रस्ता आणि बाजूचे गटार पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे वाहनचालकांना गटाराचा अंदाज येत नसल्याने असे अपघात घडत आहेत.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. एसटी बस किंवा अन्य मोठ्या वाहनांना मार्ग देताना लहान वाहने थेट गटारात जात असल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सलग दोन दिवसांत एकाच ठिकाणी अपघात झाल्याने, संबंधित विभागाने तातडीने पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी, तसेच या धोकादायक ठिकाणी इशारा फलक व बॅरिकेड्स उभारावेत, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.





























































