
अयोध्येमध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने प्रभू रामाचे मंदिर बांधण्यात आले, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत या मंदिराच्या विश्वस्त मंडळाची घोषणा केली. या विश्वस्तांमध्ये भाजपा, आरएसएस व मोदींच्या खास लोकांना नियुक्त केले व या ट्रस्टला आरटीआयच्या कक्षेतून बाहेर ठेवले. जगभरातील कोट्यवधी भक्तांनी मोठ्या श्रद्धेने प्रभूरामचरणी दान व देणगीच्या स्वरुपात अब्जावधी रुपये अर्पण केले, सोने चांदीच्या विटा, आभुषणे अर्पण केली पण या रामधनावर विश्वस्त मंडळाने दरोडा टाकला. या दरोड्याची सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधिशांमार्फत चौकशी करून आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा करा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
प्रभू रामाला लुटणाऱ्या प्रवृत्तींविरोधात काँग्रेस पक्षाने राज्यभर रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आयोजित केला आहे. याची सुरुवात नाशिकच्या काळाराम मंदिरातून करण्यात आली. यातच माध्यमांशी संवाद साधताना ते असे म्हणाले आहेत.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, राम मंदिरात अनेक दिवस लुट सुरु होती, चोरी कोणी केली, कशी केली हे सर्वांना माहित झाले आहे. भाजपा परिवारातील अनेक लोकांना ही चोरी माहित आहे पण ते बोलत नाहीत. श्रीरामालाच लुटल्याने सर्वत्र तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला जात आहे पण आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चकार शब्द काढलेला नाही. एसआयटी चौकशी सुरु असल्याचे दाखवले जात आहे पण ही चौकशी निव्वळ धुळफेक आहे. काल चंपतराय व अनिल मिश्रा यांचे राजीनामे घेण्यात आले आहेत. आदिवासी, मागासवर्गीय अथवा अल्पसंख्याक समाजाचा जर कोणी आरोपी असता तर त्यांच्या घरावर लगेच बुलडोझर चालवला असता, आता चंपत राय व अनिल मिश्रांच्या घरावर बुलडोझर कधी चालवणार? असा प्रश्नही सपकाळ यांनी विचारला आहे.





























































