
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असताना मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील धामणदेवी परिसरात मंगळवारी सकाळी दरड कोसळल्याची घटना घडली. या घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. सुदैवाने दरड कोसळताना कोणतेही वाहन त्या ठिकाणी नसल्याने जीवितहानी किंवा अन्य मोठी दुर्घटना टळली.
घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महसूल विभाग आणि पोलिस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सुरक्षिततेच्या दृष्टीने धामणदेवी ते परशुराम घाटादरम्यानची एक लेन तात्पुरती बंद करण्यात आली आहे. त्यानंतर जेसीबी आणि अन्य यंत्रसामग्रीच्या सहाय्याने रस्त्यावर पडलेले मोठे दगड, माती आणि चिखल हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. साफसफाईचे काम युद्धपातळीवर सुरू असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, घाटातून जाणाऱ्या वाहनांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, आवश्यकतेनुसार वाहतूक नियंत्रित केली जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी ठेवला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचा धोका वाढला असून, घाटमार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून सुरक्षित अंतर राखावे, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून, पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि अत्यावश्यक असल्यासच घाटमार्गाचा वापर करावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.





























































