Ratnagiri News – रस्त्याचे काँक्रीटीकरण रखडले; दापोली–मंडणगड मार्गावर चिखल, खड्डे आणि वाहतूक कोंडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दापोली–मंडणगड हा तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा संपर्क मार्ग सध्या वाहनचालक आणि नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पूर्वी डांबरी असलेल्या या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचे काम सुरू असले, तरी पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित असलेले हे काम अद्याप अपूर्णच आहे. परिणामी, रस्त्यावरील चिखल, खोदकाम, खड्डे आणि अपूर्ण बांधकामामुळे दररोज हजारो वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शनिवारी सकाळी येथे एक स्कूल बस देखील अडकून पडली होती.

सध्या या मार्गावर अनेक ठिकाणी केवळ एका बाजूचेच सिमेंट काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे, तर दुसऱ्या बाजूला रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. काही ठिकाणी मातीचे ढिगारे, तर काही ठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट बनली असून वाहनचालकांना रस्त्यावरून मार्ग काढताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना या रस्त्याचा सर्वाधिक फटका बसत आहे. चिखल आणि निसरड्या रस्त्यामुळे अनेक मोटारसायकलस्वार घसरून पडत असून किरकोळ तसेच गंभीर दुखापतींच्या घटनाही घडत आहेत. चारचाकी वाहनांनाही या चिखलातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत असून अनेक वाहने चिखलात रुतत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे.

नुकतेच या समस्येचे गंभीर स्वरूप पुन्हा एकदा समोर आले. दापोलीकडे येणारी विद्यार्थ्यांनी भरलेली एक शालेय बस चिखलात अडकून पडली. बस बराच वेळ बाहेर निघू शकली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र मोठी दुर्घटना टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. दापोली–मंडणगड मार्गावरून दररोज शेकडो विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, शेतकरी आणि रुग्णांची वाहतूक होत असते. हा मार्ग अनेक गावांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असल्याने काम रखडल्याचा परिणाम संपूर्ण परिसरावर होत आहे. पावसाळ्यात या रस्त्यावरील परिस्थिती अधिकच गंभीर बनत असून नागरिकांना मोठा आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी योग्य नियोजन झाले असते आणि पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्यात आले असते, तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती. अपूर्ण कामामुळे जनतेला त्रास सहन करावा लागत असताना संबंधित यंत्रणा मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. कामाच्या ठिकाणी अनेक ठिकाणी पुरेशी सुरक्षितता व्यवस्था नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. सूचना फलक, दिशादर्शक किंवा वाहतूक नियंत्रणाची प्रभावी व्यवस्था नसल्याने बाहेरगावाहून येणाऱ्या वाहनचालकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

पावसाळा सुरू झाल्यानंतरही रस्त्याचे काम अपूर्ण का आहे? नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या रखडलेल्या कामाची जबाबदारी कोण घेणार? प्रशासन याकडे कधी गांभीर्याने लक्ष देणार आणि दापोली–मंडणगड रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण अखेर कधी पूर्ण होणार? असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात असून, तातडीने काम पूर्ण करून वाहतुकीसाठी सुरक्षित रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.