अनेक शहरांमध्ये ATM होऊ लागले रिकामे, रोख रकमेच्या टंचाईवरून RBI ने बँकांकडे मागितला डेटा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील अनेक शहरांमधील एटीएममध्ये रोख रक्कम उपलब्ध नसल्याच्या तक्रारी सध्या मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून लोकांना एटीएममधून पैसे मिळण्यास अडचणी येत आहेत. या वाढत्या तक्रारींची दखल घेत आता भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. एबीपी न्यूजने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

आरबीआयने बँकांकडून मागितला डेटा

एनडीटीव्ही प्रॉफिटने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, एटीएममधील पैशांच्या कमतरतेबाबत आरबीआयने सर्व बँकांकडून टियर-2 आणि त्यापेक्षा छोट्या शहरांमधील उपलब्ध रोख रकमेचा संपूर्ण तपशील मागवला आहे. विविध ठिकाणी एटीएममध्ये रोख रक्कम का उपलब्ध नाही, यामागचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न रिझर्व्ह बँकेकडून केला जात आहे. याशिवाय काही बँकांनी लहान शहरे आणि गावांमध्ये खूप कमी प्रमाणात रोख रक्कम तर टाकली नाही ना, किंवा एटीएममध्ये वेळेवर पैसे रिफिल केले गेले नाहीत का, याचीही पडताळणी आरबीआय करत आहे. या चौकशीत असा कोणताही प्रकार उघडकीस आल्यास संबंधित बँकांवर कारवाई केली जाईल, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.

बँकांचे काय आहे म्हणणे?

या प्रकरणी बँकांनी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, केवळ एकूण रोख स्टॉक बघून परिस्थितीचा अंदाज लावता येत नाही. बँकांचे म्हणणे आहे की, खराब झालेले किंवा फाटलेले नोट एटीएममध्ये टाकता येत नाहीत, ज्यामुळे रोख रक्कम उपलब्ध करण्यात अडचणी येतात.

कोणत्या राज्यांमध्ये सर्वाधिक परिणाम?

एटीएममधून रोख रक्कम न मिळण्याच्या समस्येचा सर्वाधिक फटका ग्रामीण आणि निमशहरी भागातील नागरिकांना बसला आहे. अहवालानुसार, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये या समस्येचा जास्त प्रभाव दिसून येत आहे. या राज्यांमधून एटीएममध्ये पैसे नसल्याच्या सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.