
लांजा तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून अनेक गावांमध्ये वीजपुरवठा पूर्णपणे खंडित आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वीजपुरवठा खंडित होणे ही केवळ तांत्रिक बिघाडाची बाब राहिलेली नाही, तर प्रशासनाच्या निष्क्रियतेचे आणि महावितरणच्या बेजबाबदार कारभाराचे जिवंत उदाहरण बनली आहे, असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस यांनी केला आहे. शिवसैनिकांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे. पुढील १५ दिवसात वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना अंधारात ठेवणारी व्यवस्था नेमकी कोणासाठी काम करते, हा प्रश्न आता प्रत्येक लांजावासीय विचारत आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रत्नागिरी उपजिल्हाप्रमुख रविंद्र डोळस यांच्या नेतृत्वाखाली महावितरण उपविभाग, लांजा कार्यालयावर धडक देण्यात आली. मोठ्या संख्येने ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. जवळपास दोन तास चाललेल्या चर्चेनंतर संबंधित अधिकारी चव्हाण यांनी येत्या १५ दिवसांत लांजा शहरासह संपूर्ण तालुक्यातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्याचे स्पष्ट आश्वासन दिले.
यावेळी रवींद्र डोळस यांनी स्पष्ट इशारा देताना सांगितले की, पंधरा दिवसांत परिस्थिती सुधारली नाही, तर महावितरण कार्यालयाला घेराव घालून कायमचे टाळे ठोकण्याचा लढा लांजावासी उभारतील. यावेळी लांजा तालुका प्रमुख युवराज हांदे, युवासेना तालुका अधिकारी अभिजित राजेशिर्के, उपशहरप्रमुख प्रकाश (बाबू) गुरव, पुनस सरपंच संतोष लिंगायत, रिंगणे सरपंच संजय आयरे, उपविभाग प्रमुख राजेंद्र सुर्वे, उपसरपंच विग्नेश गुरव, उपसरपंच पांडुरंग पेडणेकर, उपसरपंच प्रमोद गुरव, बाबा धावणे, भाई कामत, प्रकाश पांचाळ, निकेश कडू, घनश्याम कडू, सिद्धेश गुरव, किशोर कांबळे, दिनेश गुरव, गोपीनाथ गुरव, राजा कामत, पाटोळे, अनिल कासारे, अमोल पांचाळ, महेश कांबळे, धर्मेंद्र पालीये, बबन दळवी यांच्यासह असंख्य पदाधिकारी, शिवसैनिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






























































