
अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा पाया रचण्यात ज्या खेळाडूने महत्त्वाची भुमिका बजावलली, त्या खेळाडूने आज जगाचा निरोप घेत सर्वांनाच धक्का दिला आहे. अफगाणिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शापूर जादरानचे वयाच्या 38 व्या वर्षी निधन झालं आहे. दिल्लीतील एका रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. गेले अनेक दिवस आयसीयुमध्ये हेमोफैगोसाइटिक लिम्फोहिस्टियोसाइटोसिस (HLH) या दुर्मिळ आणि जीवघेण्या आजाराशी त्याची झुंज सुरू होती. मात्र, आज (7 जुलै 2026) त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याच्या निधनाची माहिती देत दु:ख व्यक्त केले आहे.
शापूर जदरान हा अफगाणिस्तानच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात आयकॉनिक खेळाडूंपैकी एक होता. 2012 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये त्याने हिंदुस्थानविरुद्ध केलेल्या उत्कृष्ट गोलंदाजीची नेहमीच आठवण काढली जाईल. त्या सामन्यात त्याने हिंदुस्थानचा दिग्गज सलामीवीर आणि सध्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडणाऱ्या गौतम गंभीर आणि वीरेंद्र सहवाग या दोघांना बाद करून खळबळ उडवून दिली होती. त्याने आपल्या 4 ओव्हर्सच्या स्पेलमध्ये 33 धावा देत 2 विकेट्स घेतल्या होत्या. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अफगाणिस्तानसाठी 44 वन-डे सामने खेळत 43 विकेट्स आणि 36 टी-20 सामन्यात 37 विकेट्स घेतल्या होत्या.
إِنَّا لِلّهِ وَإِنَّـا إِلَيْهِ رَاجِعُونَ
With profound grief and deep sorrow, the Afghanistan Cricket Board mourns the passing of former Afghanistan fast bowler Shapoor Zadran.
Shapoor Zadran was one of the foundation-laying figures of Afghanistan cricket, whose dedication,… pic.twitter.com/iPIAJ6HLkq
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) July 7, 2026
शापूरच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून त्याची प्रकृती खालावल्याने अफगाणिस्तानच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला पुढील उपचारासाठी हिंदुस्थानात आणण्यात आले होते. त्याच्या आजारपणादरम्यान अफगाणिस्तानचे स्टार क्रिकेटपटू राशिद खान आणि मोहम्मद नबी यांनीही दिल्लीतील रुग्णालयात जाऊन त्याच्या तब्येतीची विचारपूस केली होती. मात्र, अवघ्या 38 व्या वर्षी त्याची ही मृत्यूशी झुंज अपयशी ठरल्याने संपूर्ण क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे.






























































