
पती आपल्या आई-वडिलांची काळजी घेण्याकडे विशेष लक्ष देत असल्याच्या कारणावरून पत्नी घटस्फोट मागू शकत नाही, असे महत्वपूर्ण निरीक्षण मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने एका प्रकरणात नोंदवले आणि पतीपासून घटस्फोट मिळवण्याचा पत्नीचा प्रयत्न हाणून पाडला. पती सासू-सासर्यांकडे अर्थात पत्नीच्या आई-वडिलांकडे दुर्लक्ष करतो. याचवेळी तो स्वतःच्या आई-वडिलांची विशेष काळजी घेतो, असा दावा पत्नीने केला होता. त्याच आधारे घटस्फोट मिळवत महिलेने पतीपासून पोटगी मागितली होती. न्यायालयाने तिला घटस्फोट देण्यास स्पष्ट नकार देतानाच पोटगीची मागणी फेटाळून लावली. पतीने आपल्या आई-वडिलांची काळजी घेणे आणि सासू-सासर्यांकडे दुर्लक्ष करणे या गोष्टी घटस्फोटासाठी कारणे ठरू शकत नसल्याचे मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायमूर्ती जय कुमार पिल्लई यांच्या एकलपीठाने हा निर्णय दिला. केवळ आपल्या पत्नीला खूश करण्यासाठी पुरुषाने आपल्या आई-वडिलांशी असलेले संबंध तोडावेत किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे, अशी अपेक्षा करणे अवास्तव आहे. हिंदुस्थानी संस्कृतीत मुलाने आपल्या आई-वडिलांचा सांभाळ करणे ही एक सामान्य बाब आहे, असे न्यायालयाने निर्णय देताना स्पष्ट केले.
या प्रकरणातील पतीने विभक्त पत्नी आणि दोन मुलांना दरमहा 20,000 रुपये पोटगी देण्याच्या कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले होते. त्याच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती पिल्लई यांनी विविध निरीक्षणे नोंदवली. पत्नी आणि तिच्या सासरच्या कुटुंबात सलोख्याचा अभाव असून पती तिच्यापेक्षा आपल्या कुटुंबीयांकडे जास्त लक्ष देत असल्याचे लक्षात आल्यानंतर कौटुंबिक न्यायालयाने आदेश दिला होता. पत्नीने पतीपासून वेगळे राहण्याच्या निर्णयामागे हेच एकमेव कारण सांगितले होते. पतीने त्या निकालाला आणि पत्नीला देण्यात येणाऱ्या पोटगीच्या निर्णयाला आव्हान देत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पत्नी कोणत्याही पुरेशा कारणाशिवाय स्वेच्छेने माहेरी निघून गेली होती. त्यामुळे ती कोणत्याही पोटगीच्या रकमेसाठी पात्र नव्हती, असा युक्तिवाद अपीलकर्त्या पतीच्या वकिलांनी केला. हा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला.



























































