परभणी महापौरांच्या दालनात हल्ल्याचा प्रयत्न; आरोपी अटकेत, मनपा कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परभणी शहर महानगरपालिकेचे शिवसेनेचे महापौर सय्यद इकबाल यांच्या दालनात गुरुवारी सायंकाळी 6.30 वाजता हल्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी एका आरोपीवर नवा मोंढा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक केली आहे. शेख रफिक शेख रौफ असे त्याचे नाव आहे.

या घटनेच्या निषेर्धात आज 10 जुलै रोजी अधिकारी, कर्मचारी संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन करण्यात आले . याबाबत अधिक माहिती अशी की, कचरा डम्पिंग संदर्भातील अर्जावर कारवाई न झाल्याच्या कारणावरुन आरोपीने महापौरांच्या दालनात गोंधळ घालत परवानगी शिवाय मोबाईल वर चित्रीकरण सुरु केले. तसेच महापौरांच्या अंगावर धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हस्तक्षेप करणारे स्वीय सहाय्यक रमेश चव्हाण यांना धक्का बुक्की करुन त्यांचा चश्मा फोडून सरकारी कामात अडथळा निर्माण करण्यात आला. या घटनेनंतर महानगरपालिकेतील कर्मचार्‍यांनी, सुरक्षा रक्षकांनी सदर व्यक्तीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. कार्यालयात येण्यापुर्वी चौकशी दरम्यान आरोपीने कार्यालयात येण्यापूर्वी कचर्‍यात चाकू फेकला होता अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तो चाकू जप्त केला आहे. या प्रकरणी महापौरांचे स्वीय सहाय्यक रमेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरून शेख रफिक शेख रौफ याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास नवा मोंढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक शिंदे करत आहेत.

महापौरांच्या मध्यस्तीनंतर आज दुपार नंतर काम बंद आंदोलन मागे

या घटनेचा निषेध म्हणून अधिकारी, कर्मचारी संघटने तर्फे आज सकाळी महानगरपालिकेच्या प्रवेशव्दारा समोर घटनेच्या निषेर्धात काम बंद आंदोलन करत दोषीवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. या आंदोलनात शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापौर सय्यद इकबाल यांच्या मध्यस्ती नंतर आज दुपारी काम बंद आंदोलन मागे घेण्यात आले. महानगरपालिकेतील लोकप्रतिनिधी व कर्मचार्‍यांच्या सुरक्षित्तेचा प्रश्न ऐरणीवर आला असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.