
>> प्रसाद ताम्हनकर ([email protected])
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय (AI) ने मानवी जीवनाचा ताबा घेतला असतानाच आता रोबोटिक्सच्या क्षेत्रात एक अत्यंत विस्मयकारक आणि क्रांतिकारी शोध लागला आहे. आजवरचे रोबोट्स हे केवळ पाहणे, ऐकणे किंवा दिलेल्या आज्ञेनुसार हालचाल करणे यापुरतेच मर्यादित होते. मात्र आता त्यांना मानवासारखीच स्पर्शज्ञान आणि संवेदनशीलता देणारी प्रगत कृत्रिम त्वचा विकसित करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. दक्षिण कोरियातील सोल नॅशनल युनिव्हर्सिटीच्या (Seoul National University) यांत्रिक अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक सुंग ह्वान को आणि त्यांच्या संशोधन पथकाने हे अभूतपूर्व तंत्रज्ञान जगासमोर आणले आहे. या नव्या शोधामुळे आता रोबोट्स केवळ वस्तू उचलणार नाहीत, तर मानवी त्वचेप्रमाणेच एकाच वेळी ती वस्तू गरम आहे की थंड आणि त्यावर किती दाबाने पकड ठेवायची आहे, हे अचूकपणे ओळखू शकणार आहेत.
भौतिक जगात वावरताना आणि मानवाशी संवाद साधताना रोबोट्सना स्पर्शाची जाणीव असणे अत्यंत आवश्यक मानले जाते, ज्याला तांत्रिक भाषेत फिजिकल एआय (Physical AI) असे म्हटले जाते. मानवी त्वचा ही निसर्गाची एक अद्भुत रचना आहे, जी एकाच वेळी अनेक प्रकारच्या संवेदना मेंदूपर्यंत पोहोचवते. यापूर्वी रोबोट्सना तापमान आणि दाब कळावा यासाठी वेगवेगळ्या थरांचे किंवा अनेक प्रकारच्या सेन्सर्सचे क्लिष्ट जाळे एकत्र जोडले जायचे. यामुळे रोबोट्सचे हात जड आणि जाड व्हायचे, तसेच त्यांची काम करण्याची गती कमालीची संथ असायची. हाच मोठा अडथळा दूर करण्यासाठी कोरियन शास्त्रज्ञांनी चांदी (Ag) आणि कॉपर ऑक्साइडच्या अतिसूक्ष्म तारांचे (Nanowire Network)) एक विशेष जाळे तयार केले आहे. हे जाळे इतके पातळ आहे की, ते केवळ एकाच थरामध्ये सेकंदाला तब्बल 16 वेळा आपले मोड बदलू शकते. म्हणजेच एकाच सेकंदात हे तंत्रज्ञान 16 वेळा तापमान आणि दाबाची आलटून पालटून पडताळणी करते.
या अतिसूक्ष्म आणि अत्याधुनिक संरचनेमुळे या कृत्रिम त्वचेचा प्रतिसाद देण्याचा वेग मानवी डोळ्याच्या पापणी लवण्याच्या वेगापेक्षाही हजारो पटीने वेगवान आहे. दाबाची जाणीव होण्यासाठी या सिस्टिमची गती मायक्रोसेकंद, तर तापमानासाठी मिलिसेकंद पातळीवर मोजली गेली आहे. शास्त्रज्ञांनी या कृत्रिम त्वचेचा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा मेळ घालून केलेल्या प्रयोगादरम्यान रोबोटने दैनंदिन वापरातील 20 वेगवेगळ्या वस्तू मानवी हाताच्या अचूकतेने निव्वळ स्पर्शाने ओळखल्या. यामध्ये एखादी वस्तू हाताळताना ती किती मऊ किंवा कडक आहे, तसेच तिचे तापमान काय आहे, याचे पृथक्करण रोबोटच्या सिस्टिमने रिअल-टाईममध्ये केले. या संशोधनाचे जागतिक स्तरावर कौतुक होत असून विज्ञान जगतातील अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या नेचर मटेरियल्स या नियतकालिकात या शोधनिबंधाला स्थान मिळाले आहे.
भविष्यात या तंत्रज्ञानाचा वापर प्रामुख्याने वैद्यकीय क्षेत्रात कृत्रिम अवयव (Prosthetics) बनवण्यासाठी मैलाचा दगड ठरेल. ज्या व्यक्तींनी अपघातात आपले हात किंवा पाय गमावले आहेत, त्यांना लावण्यात येणाऱ्या कृत्रिम हातांना जर या त्वचेचे आवरण दिले, तर त्यांना पुन्हा एकदा स्पर्शाचे सुख अनुभवता येऊ शकते. याशिवाय कारखान्यांमध्ये नाजूक वस्तू हाताळणारे रोबोटिक ग्रिपर्स, सॉफ्ट रोबोटिक्स आणि थेट मानवाशी संवाद साधणारे घरगुती रोबोट्स यांच्या सुरक्षेसाठी हे तंत्रज्ञान अत्यंत कळीचे ठरणार आहे. जेव्हा रोबोट एखाद्या लहान मुलाला किंवा रुग्णाला स्पर्श करेल, तेव्हा त्याच्या हाताचा दाब किती असावा हे या त्वचेमुळे नियंत्रित होईल, ज्यामुळे अपघात टळू शकतील. विज्ञान आणि मानवी संवेदनांचा हा मिलाफ भविष्यातील मानवी जीवन अधिक सुकर आणि सुरक्षित करणारा ठरेल यात शंका नाही.
या तंत्रज्ञानाचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे धोक्याच्या ठिकाणी काम करणाऱ्या बचाव पथकातील रोबोट्सना यामुळे मोठी मदत होईल. ढिगारे किंवा आगीच्या दुर्घटनेत अडकलेल्या मानवी शरीराचा शोध घेताना, हे रोबोट्स केवळ उष्णता आणि वजनाचा अंदाज घेऊन जीवित व्यक्तींना शोधू शकतील, ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्य अधिक वेगाने करणे शक्य होईल.


























































