
>> डॉ. आशुतोष कुलकर्णी
जेवणाची लज्जत वाढवणारे लोणचे. त्याचे आहारातील महत्त्व लक्षात घेऊया.
षड्रस भोजन करताना आयुर्वेदानुसार आहार हा सर्व ज्ञानेंद्रियांना आनंद देणारा असावा असे सांगितले आहे. त्यासाठी आहारात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ की जे चाटून, चावून, चोखून, पेय, भोज्य म्हणजे गिळून खाता येणारे असावेत.
उदा.
लेह्य किंवा चोष्य चाटून किंवा चोखून खाण्याचे पदार्थ. उदा. मध, चटणी, लोणचे, आम्ररस.
भोज्य म्हणजे सहज गिळता येणारे किंवा मऊ अन्न पदार्थ उदा. भात, वरण, आमटी, खिचडी.
पेय म्हणजे पिण्याचे पदार्थ… उदा. पाणी, दूध, ताक, सरबत, सूप.
भक्ष्य दातांनी तोडून किंवा चावून खाण्याचे कठीण पदार्थ. उदा. भाकरी, चपाती, पोळी, लाडू, बिस्कीट.
यातीलच चाटून खाण्याचा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे लोणचे.
हजारो वर्षे मनुष्य लोणच्याचे अनेक प्रकार खात आहे. वर्षातून एकदा पिकणारे पदार्थ टिकवून ठेवण्यासाठी आणि त्याचा आस्वाद वर्षभर घेण्यासाठी लोणचे हा उपयुक्त प्रकार आहे. प्राचीन काळात जेव्हा व्यापारी आणि प्रवासी लांबच्या प्रवासाला जायचे तेव्हा अन्न खराब होऊ नये म्हणून मीठ, तेल आणि मसाल्यांचा वापर करून फळे व भाज्या टिकवून ठेवल्या जात असत.
लोणचे हे कमी प्रमाणात सेवन केले पाहिजे. जेवण बनवताना जसे गॅस पेटवायला लायटर, चूल पेटवायला पेटती काडी लागते तसेच काहीसे काम जठराग्नी उद्दीपित करण्यासाठी लोणच्याचा उपयोग होतो. मात्र अधिक प्रमाणात खाल्ल्याने छातीत जळजळ, आम्लपित्त आणि तिखटपणामुळे मूळव्याधीसारख्या व्याधी त्रास देतात.
जगाच्या पाठीवर विविध प्रकारची लोणची बनवली जातात. ‘लोणचे’ या मराठी शब्दाचा उगम मिठासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘लवण’ या संस्कृत शब्दातून झाला असावा. हिंदीत वापरला जाणारा ‘अचार’ हा शब्द मूळ पर्शियन भाषेतून आला आहे.
भारतात वेगवेगळ्या ऋतूंनुसार कैरी, लिंबू, मिरची, आवळा, गाजर, भोकर, माइनमुळा, कच्ची करवंदे, ओली हळद तसेच मांसाहारी पदार्थ कोळंबी, सुके बोंबील इत्यादींपासून विविध प्रकारची लोणची बनवली जाऊ लागली.
महाराष्ट्रात आणि भारतात प्रत्येक भागात गोड, आंबट, तिखट, खारट लोणच्याच्या चवी आणि प्रकार आहेत.
आजच्या बाजारू प्रवृत्तीमुळे पामतेल वापरून अन्न बुरशीपासून वाचविण्यासाठी त्यात अनेक घातक रसायने वापरून तयार केलेली लोणची शक्यतो खाऊ नयेत.
शक्य असेल तर घरात बनवलेले लोणचेच खाणे योग्य आहे.
लोणचे प्रमाणात खाल्ल्यास त्याचे फायदे आहेत. लोणच्यामधील ओवा, मेथी आणि हिंग यांसारखे मसाले पाचक रस सक्रिय करून अन्न पचवण्यास मदत करतात. जेवणात लोणचं असल्यास तोंडाची चव सुधारते आणि खाण्याची इच्छा वाढते. नैसर्गिकरीत्या आंबवलेल्या घरगुती लोणच्यामध्ये पोटासाठी उपयुक्त असणारे चांगले जिवाणू असतात. हळद, मोहरी आणि मेथीमुळे शरीराला आवश्यक असणारे अँटिऑक्सिडंट्स मिळतात.
लोणच्याचे अति प्रमाणात सेवन केल्यास तोटेदेखील होतात. लोणच्यामध्ये मिठाचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तदाब वाढत्या वयाचा धोका असतो. अति तेलकट आणि तिखट लोणच्यामुळे पोटात जळजळ किंवा आम्लता (Acidity) वाढू शकते. खूप जुने किंवा अयोग्य पद्धतीने साठवलेले लोणचे खाल्ल्याने पचनक्रिया बिघडू शकते. सतत आणि जास्त लोणचं खाल्ल्यामुळे किडनी व हृदयाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात.
विशेषत असे लक्षात आले आहे की, वारंवार त्वचेचे आजार होणारे रुग्ण लोणचे आणि पापडाचे अति सेवन करतात
त्यामुळे आरोग्य राखण्यासाठी लोणचे प्रमाणात सेवन करा आणि घरात बनवलेले खा.
























































