अभिप्राय – झपाटलेल्या पत्रकारितेची ‘बखर’!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> राहुल गोखले

अर्धवेळ वार्ताहर ते प्रथितयश वृत्तपत्रांचे संपादक अशी वासुदेवराव कुलकर्णी यांची या क्षेत्रातील वाटचाल आहे. गेल्या चाळीस-पन्नास वर्षांच्या बदलत्या काळाचे ते साक्षीदार आहेत. एका सजग पत्रकाराच्या नजरेतून पाहिलेला हाच काळ त्यांनी ‘मंतरलेल्या दिवसांची बखर’ या पुस्तकातून जिवंत केला आहे.

कोल्हापूरपासून दिल्लीपर्यंत माध्यम प्रतिनिधी म्हणून काम केल्यामुळे, त्यांच्या लेखांत स्थानिक ते राष्ट्रीय राजकारणाचे अनेक संदर्भ येतात. पंजाब, कश्मीर, अयोध्येतील नाटय़मय घडामोडी असोत, की अवघ्या एका मताने कोसळलेले वाजपेयी सरकार; या ऐतिहासिक क्षणांचे ते साक्षीदार आहेत. या घडामोडींचा वेध त्यांचे लेख प्रभावीपणे घेतात. राजनारायण यांची रात्री दहा वाजता घेतलेली मुलाखत किंवा अर्थमंत्री झाल्यावर मधु दंडवते यांची कुलकर्णींनी मराठी वृत्तपत्रासाठी घेतलेली पहिली मुलाखत, अशा आठवणी पुस्तकाची रंगत वासंसदपटू मधु लिमये यांच्या आठवणी मनाला भिडणाऱया. तथापि पुस्तकाचे खरे बलस्थान म्हणजे लेखकाने वार्तांकनादरम्यान केलेल्या धडपडीचे थरारक वर्णन! जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असणारे आई-वडील, सामान्य आर्थिक स्थिती यामुळे कोल्हापुरात शिकत असताना त्यांनी घरोघरी पेपर टाकण्याचे काम केले. त्यातूनच वर्तमापत्रे व पुरवण्या वाचण्याची लागलेली गोडी त्यांना पत्रकारितेकडे घेऊन गेली. हा प्रवास त्यांनी मनोगतातून उलगडला आहे.

दुचाकीवरून किंवा प्रसंगी बसने केलेला दूरवरचा प्रवास, रेल्वेगाडीची तासन्तास करावी लागलेली प्रतीक्षा आणि बातमी वृत्तपत्र कार्यालयापर्यंत पोचवण्यासाठी ‘ट्रंक कॉल‘सारख्या मर्यादित पर्यायांवर अवलंबून राहावे लागणे अशा काळात लेखकाने बातमीदारी केली. त्यामुळेच बातमीदारीमधील लेखकाचा प्रामाणिकपणा, वस्तुनिष्ठतेची असणारी चाड व झपाटलेपण यांचा प्रत्यय पानोपानी येतो. 1990 च्या निवडणुकीत जनता दलाचे उमेदवार शंकर धोंडो पाटील यांनी, जुन्या पराभवाची पार्श्वभूमी लक्षात घेता, प्रचारसभेची सांगता करताना ‘जिवंतपणी माझ्यावर गुलाल उधळा’ या केलेल्या भावनिक आवाहनाला मतदारांनी प्रतिसाद दिला. हा प्रसंग लेखकाने रेखाटला आहे. लेखकाने दुष्काळी भागांचे किंवा किल्लारीच्या भूकंपाचा काळ; थरकाप उडवणाऱया परिस्थितीचे त्यांनी जिवंत वर्णन केले आहे. ‘खग्रास सूर्यग्रहणाचा’ वृत्तांत; कामेरी येथील बस अपघाताची माहिती मिळताच तेथे तातडीने धाव घेऊन शांताराम जोग आणि जयंत हर्डीकर यांच्या अपघाताचे केलेले वार्तांकन यातून लेखकाच्या कसदार बातमीदारीची चुणूक दिसून येते.

कोल्हापूरच्या खासबाग मैदानात वि. स. खांडेकर यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याला लाभलेली तब्बल 25 हजारांची अभूतपूर्व गर्दी; कोल्हापुरात खोदकामात सापडलेली सोन्याची नाणी आणि इतिहासकार ग. ह. खरे यांच्या अचूक मार्गदर्शनामुळे पोलीस निरीक्षक माणिकराव दमामे यांनी उरलेली चोरीला गेलेली नाणी वेगाने शोधून कायाचा प्रसंग; बेंगळुरूमधील सर्कशीला लागलेल्या आगीत 100 मुलांचा होरपळून झालेला दुर्दैवी मृत्यू अशा महत्त्वाच्या घटनांचे वार्तांकन लेखकाने केले असल्याने हे कथन जिवंत बनले आहे. त्या काळातील अनेक सामाजिक-राजकीय घडामोडींवर त्यातून प्रकाश पडतो. यशवंतराव चव्हाण, पत्रकार अनिल कुलकर्णी, ‘मोरारजी देसाई हे पंतप्रधान होतील’ असे भाकीत 1974 मध्येच वर्तविणारे ‘गर्जना’ पत्राचे संपादक श्यामकांत पाध्ये, जयंतराव टिळक यांच्या आठवणी हृद्य.

पुस्तकाला ज्येष्ठ पत्रकार अरविंद व्यं. गोखले यांची लाभलेली प्रस्तावना वाचनीय. गौरीश सोनार यांनी साकारलेले मुखपृष्ठ वेधक.

मंतरलेल्या दिवसांची बखर
लेखक ः वासुदेव कुलकर्णी
प्रकाशक ः भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर
पृष्ठे ः ; मूल्य ः 360 रुपये