
>> वर्णिका काकडे
काव्य स्फुरणे हे एक साहित्यिक वरदानच. कारण केवळ शब्दांची माळ जोडायची आणि त्याला काव्य म्हणायचे तर सर्वात प्रथम विचार येतो तो आशयघनतेचा. कवितेतला आशय वाचकाच्या मनात उतरताना कवी, कविता आणि वाचक असं वर्तुळ पूर्ण होतं व ते काव्य मग कवीचे राहत नाही. ते वाचकाच्या ओंजळीत सुपूर्द झालेलं असतं. अशा अनेक कवींच्या शब्दांना वाचकांपर्यंत पोहोचवणारा हा काव्यसंग्रह ‘मैफिल.’ अजिंक्य जाधव यांनी संकलित व संपादित केलेल्या या काव्यसंग्रहात शब्दांना न्याय देणाऱया 58 कवितांचा समावेश झाला आहे. 50 पेक्षा अधिक कवींच्या आशयघन कवितांचा हा संग्रह असून यात आधुनिक कवितेतील सर्व प्रवाहातील कवितांचा समावेश आहे.
एखादी कविता सुचावी आणि ती वाचकापर्यंत पोहोचावी यातलं अंतर म्हटले तर घडीचे आणि म्हटले तर एका युगाचे. या काव्यातून प्रतीत होणारा अर्थ वाचकाच्या अंतकरणापर्यंत पोहोचावा ही आस प्रत्येक कवीला असते. संपादक अजिंक्य जाधव यांनी काव्य आणि रसिक यांच्यातील दुवा होण्याची ही भूमिका अगदी योग्य पार पाडली असल्याचे या संग्रहातून दिसून येते. निसर्ग, प्रेम, समाज, संस्कृती, मानवी भावना या साऱयाला वाट देणारे गीत, गझल हे काव्यप्रकार या संग्रहात आहेत. ही निवड अगदी अचूक असल्याचे संग्रह वाचताना लक्षात येते.
काव्यानुभावाची आंतरिक गरज म्हणून समोर येणारे शब्द मानवी भावनांना न्याय देणारे असावेत ही कोणत्याही काव्यनिर्मितीतील मुख्य अट. या संग्रहातील कवितांमधून हा हुंकार आपल्याला दिसतो. शिवम शिंदे यांची अशीच एक अर्थवाही कविता भावनांना अगदी योग्य न्याय देणारी. कवी म्हणतो,
आली भरती, अनेकदा, परी सोडला ना ठाव मी
वेळ सरते, सांज होते, गाळ मग तो सैलतो,
ताणूनी ती दोर, वात सागरी मज ओढता’
अतिशय सुंदर आणि संयत भावना यातून व्यक्त होते. दुःखाचे, वेदनेच कढ ओढताना हरल्याची भावना आली तरी सोसण्यातील असोशी कुठेही कमी होणार नाही हेच यातून कवी सांगत आहे. सुप्रिया सावंत यांची लघु कविता स्त्रीच्या भावना व्यक्त होताना व्यापलेलं जग दर्शवणारी आहे.
‘आज दळत होते दुपारी जात्यावर
जात्याभोवतीची रास वाढत होती
विचारांचाही ढीग वाढतोच आहे’
संग्रहातील सर्वच कविता स्पर्श करणाऱया आहेत. वेगवेगळ्या भावनांचे शब्दरूप साकारणारी ही मैफलच म्हणायला हवी. या मैफलीतील प्रत्येकाच्या कवितेचा प्रकार वेगळा आहे. त्यामुळे या काव्यसंग्रहात वैविध्य दिसून येते. विषयाचे, रचनेचे, प्रयोगशीलतेचे, मांडणीचे असे वैविध्य असणारा हा काव्यसंग्रह वाचनीय झाला आहे.
कवितेची निर्मिती होताना तिच्यातील वेदना, भाव अनेक स्तरातून व्यक्त होत असतात. मनाच्या अनेक पातळ्यांवर सुरू असलेली ही प्रक्रिया या काव्यसंवेदनांमधून व्यक्त झाली आहे. त्यामुळे यातील प्रत्येक कविता वाचकाला स्वतची वाटणारी आहे. काव्यसंपदन ही तशी अवघड बाब. मात्र काव्यनिवडीबाबत संपादकांचे कौशल्य दिसून येते. वैविध्य देताना त्यातील गुणवत्ता राखली जावी याकडे त्यांचा असलेला कल या निवडीतून दिसून येतो. काव्यरसिकांनी आवर्जून वाचावा असा संग्रह आहे.
मैफिल (काव्यसंग्रह)
संपादक ः अजिंक्य जाधव
प्रकाशक ः अनुराधा प्रकाशन
पृष्ठे ः 79 ह मूल्य ः 150 रुपये
























































