
जम्मू-कश्मीरमधील सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सच्या एका आमदाराला पक्षांतरासाठी भारतीय जनता पक्षाने 30 कोटींची ऑफर दिल्याचा खळबळजनक आरोप मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज केला. संबंधित आमदाराने ही ऑफर नाकारून अब्दुल्ला यांना माहिती दिल्याने भाजपची पोलखोल झाली.
भाजपचा पदाधिकारी असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलाने ही ऑफर दिली होती. जम्मूतील आमच्या एका आमदाराशी या वकिलाने बंद दाराआड चर्चा केली. या चर्चेत त्याने आमच्या आमदाराला 20 ते 30 कोटी रुपये, मंत्रिपद आणि जम्मू-कश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्याचे आमिष दाखवले. त्या बदल्यात नॅशनल का@न्फरन्स सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याची अट घातली, असे अब्दुल्ला यांनी सांगितले. ‘आमच्या आमदारांच्या निष्ठा तुम्हाला इतक्या स्वस्त वाटतात का,’ असा संताप अब्दुल्ला यांनी व्यक्त केला.
मागचा दरवाजा तुमच्यासाठी बंद आहे!
‘भाजपच्या लोकांनी आम्हाला इतके कमपुवत समजू नये. लोकांनी तुम्हाला दूर ठेवले आहे. तुम्हाला दूरच राहावे लागेल. मागच्या दाराने सत्ता बळकावण्याचा तुमचा प्रयत्न आहे, पण तो यशस्वी होणार नाही. तुमच्यासाठी मागचा दरवाजा बंद आहे,’ असे अब्दुल्ला यांनी ठणकावले.


























































