बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण – अनमोल बिष्णोईचा ताबा घेण्यात अपयश, पोलिसांची विशेष न्यायालयाकडून कानउघाडणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी गँगस्टर अनमोल बिष्णोईचा ताबा मिळविण्यात अपयशी ठरल्याबद्दल विशेष मकोका कोर्टाने आज मुंबई पोलिसांना फटकारले. आरोपीची कोठडी मिळवणे, तपास करणे, आरोपीची चौकशी करणे आणि त्याच्यावर खटला चालवणे ही पोलिसांची जबाबदारी असल्याचे खडसावत तपास यंत्रणेला तिच्या वैधानिक कर्तव्यांची आठवण करून देणे हे न्यायालयाचे काम नाही, असे खडे बोल न्यायालयाने सुनावले. इतकेच नव्हे तर बिष्णोईला न्यायालयासमोर हजर करण्यासाठी सर्व उपाययोजना तातडीने राबविण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

बाबा सिद्दिकी यांच्या कुटुंबीयांनी गेल्या आठवड्यात न्यायालयात अर्ज दाखल करून मुंबई पोलिसांनी अनमोल बिष्णोईचा ताबा जाणूनबुजून घेतला नसल्याचा आरोप केला होता. त्यांनी यामागे दबाव असल्याचाही दावा केला होता. विशेष मकोका न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी बाबा सिद्दिकी यांच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या अर्जावर आदेश देताना म्हटले की, संबंधित न्यायालयाची परवानगी घेऊन या प्रकरणात अनमोल बिष्णोईला औपचारिक अटक करता येऊ शकते.

आवश्यक असल्यास दिल्लीतील संबंधित न्यायालयाची परवानगी घेऊन कोठडीत असतानाच त्याची चौकशीही करता येऊ शकते. या कायदेशीर पर्यायांकडे तपास यंत्रणेने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अंतर्गत निर्धारित प्रक्रियेचे काटेकोर पालन करून अनमोल बिष्णोईची उपस्थिती सुनिश्चित करण्याचे आदेश दिले.