विज्ञान रंजन – किती एक ते…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विनायक

11  जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिवस होता. दरवर्षी या दिवसाचं एक जागतिक बोधवाक्य (थीम) असतं. या वर्षीचा संकल्प होता ‘तरुण पिढीच्या आशा आणि अपेक्षा यांची जाणीव ठेवणे.’ काळानुसार पुढच्या पिढ्यांच्या हातीच जगाचं (नेहमीच) भवितव्य असतं. संस्कृतीचा प्रवाह, स्वतःमध्ये आपोआप बदलकरीत अनेक पिढ्यांना जोडून घेत अव्याहतपणे वाहत असतो. मागच्या आणि पुढच्या पिढीच्या जाणिवा आणि रीतीभाती यात फरक पडतो. तसा तो पडत राहाणं यातच कालक्रमाचं यश असतं. जुन्यातील‘सोनं’ टिकवून नव्यातीलहवं ते घेत समाज पुढे जात असतो. त्यातूनच भाषा, वेशभूषा, खाणंपिणं, यांत्रिक साधनं यात बदलहोत असतो. तो अपरिहार्यच. फक्त त्यात विकृती येणार नाही याची काळजी मागच्या-पुढच्या सर्वच पिढ्यांनी घ्यायची असते. यासाठी दोन पिढ्यांत सततचा संवाद हवा. मागच्या पिढीकडे अनुभव (एक्स्पिरिअन्स) असतो. तर पुढच्या पिढीला नव्या जगाचं अधिक आकलन (एक्स्पोजर) असतं. या दोन्हीमध्ये विसंवाद किंवा कन्फ्युज होण्यापेक्षा दोन्ही पिढ्यांच्या विचारांचे योग्य संमीलन (फ्युजन) झालं तर सर्वांचंच जीवन सुरेल होईल. त्यासाठी अनुभवी असणाऱ्या आधीच्या पिढीने पुढाकार घ्यावा लागतो.

लोकसंख्या दिनाच्या यंदाच्या संकल्पाच्या निमित्ताने हे सुचलं. पिढ्यांन्पिढ्यांनी परस्परांना समजून राहण्यातच जीवनातलं ‘रंजन’ आहे. मात्र एकूण लोकसंख्या या विषयातलं विज्ञानही तितकंच रंजक असू शकतं. लोकसंख्येची मोजदाद किंवा जणगणना पूर्वापार होत आली आहे. अमुक गाव शंभर किंवा दीडशे ‘उंबऱ्यांचं’ आहे असं म्हणण्याची प्रथा आमच्या बालपणीही होती. एका घरात सरासरी तीन पिढ्य़ांतली दहा माणसं आहेत असं मानलं तर शंभर ‘उंबऱ्यांच्या’ गावात सुमारे हजार माणसे राहतात हे स्पष्ट व्हायचं. आता ‘उंबरा’ म्हणजे घराच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीतलं ताशीव पट्टीसारखं उंबराचं लाकूड. या उंबरठ्यावर ठेवलेलं भरल्या तांदळाचं माप ओलांडून नवी सून घरात यायची. आज आधुनिक फ्लॅटमध्येही असा पारंपरिक कार्यक्रम होतोच. धान्य पसरण्यामागे समृद्धीची संकल्पना असते.

तर लोकसंख्येची मोजणी जगात सर्वत्र व्हायची त्याची नोंद अनेक ऐतिहासिक कागदपत्रांत सापडेल, परंतु लिहिणं-नाचणं वगैरे गोष्टीच नव्हत्या आणि माणसं ‘व्हिझा’ वगैरे नसल्याने ‘सब भूमी गोपालकी’ पद्धतीने पृथ्वीभर, सर्वसंचारी होती तेव्हा किती लोकसंख्या होती त्याचंही अनुमानशास्त्र आहे.

सध्या जगातली माणसांची लोकसंख्या आठ अब्ज तीस कोटी आहे. जगभरातील जन्म आणि मृत्यूची क्षणोक्षणी नोंद करीत हा आकडा बदलत जातो. अर्थात एकोणीसाव्या शतकापासून जगातली मानवसंख्या विलक्षण वेगाने वाढली.

पृथ्वीवर आपले सर्वांचे पूर्वज असलेली ‘होमोसेपिअन’ प्रजाती विकसित झाली तो काळ सुमारे तीन लाख वर्षांपूर्वीचा सांगितला जातो. हे आधुनिक परिमाण आहे. विविध संस्कृतीच्या याबाबतच्या अंदाजात मतभेद आहेत. हे सैद्धांतिक भेद बाजूला ठेवले तरी आपण ‘आहोत’ याचाच अर्थ कुठेतरी, केव्हातरी ‘होमोसेपियन’ विकसित झालेच असणार. दक्षिण आफ्रिकेतील टांझानिया आणि केनयामधील‘ग्रेट रिफ्ट व्हॅली’मध्ये ‘होमोसेपियन’ प्रजातीचा ‘पाळणा’ हलला तसंच दक्षिण आफ्रिकेमधल्याच जोहान्सबर्गजवळच्या गाउटेंग येथेही 47000 वर्षांपूर्वीचे मानवी जीवाष्म सापडले आहेत.

त्याआधी महाप्रलय वगैरे होऊन मानवी संस्कृती नव्याने बहरण्याचे प्रकारही घडले असतील; पण सध्या तरी हीच ‘थिअरी’ मानली जाते. त्यापूर्वीचे जीवशास्त्रीय पुरावे मिळाले तर हे गृहितक (अॅझम्पशन) बदलावंच लागेल. आरंभीच्या काळात नैसर्गिक आपत्ती, हिंस्र प्राण्यांचा उपद्रव, युद्ध, रोगराई अशा अनेक कारणांनी मृत्युदर खूप होता. कुपोषणामुळे बालमृत्यूचं प्रमाणही मोठं होतं. त्यामुळे घरटी अनेक मुलं होऊनसुद्धा लोकसंख्येला एखादा नष्टतेचा फटका बसला तर लोकसंख्या कमालीची कमी व्हायची. त्या काळात जगातील एकूण माणसांची संख्या काही लाखांत असायची. इसवीसन पूर्व 10 हजार म्हणजे 12026 वर्षांपूर्वी जगात फक्त 40 लाख माणसं राहत होती. आज ती एका मध्यम शहराची लोकसंख्या असते. इसवीसनाच्या पहिल्या शतकात जग 17 कोटींचं झालं. इ.स. 1000 मध्ये 31 कोटी, 1500मध्ये 46 कोटी तर 1804मध्ये प्रथमच जगाने एक अब्जाचा आकडा ओलांडला. 1974मध्ये तो 4 अब्जावर तर 2022मध्ये 8 अब्ज झाला.

‘वाढता वाढता वाढे’ असं हे लोकसंख्येचं प्रमाण साथीच्या रोगांवर मात, युद्धाचं ‘रिमोट’ (दूरस्थ) तंत्र, यांत्रिक सोयीसुविधा यातून निर्माण झालं. नैसर्गिक आपत्तींचा पूर्व अंदाज अनेक बळींची संख्या आटोक्यात आणू लागला. जन्मदर फार न घटता मृत्यूदर मात्र कमी होऊन सरासरी वय वाढलं. शतायुषी माणसांची आजच्या जगातली अंदाजे संख्या 5,73,000 इतकी तर तरुणांची 1 अब्ज 80 कोटी आहे. आपला देश ‘तरुण’ मानला जातो (65 टक्के तरुणाई).

मानवी अस्तित्वापासून आतापर्यंत सुमारे 127 अब्ज माणसं जन्माला आली आणि 109 अब्ज कालवश झाली! ‘समर्थांच्या शब्दात ‘कितीएक ते जन्मले आणि गेले’ याचा हा ठोकताळा. 93000 वर्षांपूर्वी आलेल्या हिमयुगात तर केवळ काही हजार माणसंच वाचली होती आणि 70 हजार वर्षांपूर्वी इंडोनेशियातला ‘तोबा’ ज्वालामुखी असा उफाळला की त्यातील राख आणि धुळीने अनेक वर्षे पृथ्वी झाकोळली आणि माणसांत जैविक (जिनोम) बदल घडला असं म्हटलं जातं. अफाट लोकसंख्या वाढ हा शाप की वरदान यात मतभेद आहेत. पुढच्या पिढ्यांसाठी जग सुखी ठेवण्याची जबाबदारी आजच्या आणि उद्याच्याही पिढ्यांची आहे एवढं मात्र खरं!