देणगीचोरीमुळे रामभक्तांच्या विश्वासाला तडा; हे राम! अयोध्येत भाविकांची संख्या घटली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या दानपेटीवर पडलेल्या दरोडय़ामुळे तमाम रामभक्तांच्या विश्वासाला तडा गेला आहे. या चोरीचे आर्थिक आणि सामाजिक परिणाम दिसू लागले असून अयोध्येत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या कमालीची घटली आहे. रामभक्तांच्या भरवशावर चालणारे अयोध्येतील सर्व व्यवसाय थंडावले आहेत. हॉटेलांचे बुकिंग 75 टक्क्यांनी घसरले असून मालाची विक्री होत नसल्याने हारफुल, प्रसाद विव्रेते दुकानदार काळजीत पडले आहेत.

रामाच्या नावावर राज्य करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने विश्वस्त म्हणून नेमलेल्या लोकांनीच राम मंदिरातील दानपेटी लुटल्याने अयोध्येची आणि मंदिराची जगभर बदनामी झाली आहे. त्याविरोधात तीव्र संताप आहे. या चोरीची दखल आंतरराष्ट्रीय माध्यम समूहांनीही घेतली असून जगभरात या चोरीची चर्चा आहे. राम मंदिरातील लुटीनंतर अयोध्येत नेमके काय बदलले यावर देशीविदेशी माध्यमांनी वार्तांकन केले आहे. त्यानुसार चोरीच्या घटनेनंतर अयोध्येत रामभक्तांची गर्दी ओसरली आहे. त्याचा परिणाम अयोध्येतील उद्योग-व्यवसायावर झाला आहे.

आरएसएसने व्यक्त केला खेद

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बेळगावमध्ये झालेल्या बैठकीत राम मंदिरातील चोरीबद्दल खेद व्यक्त केला. सध्या सुरू असलेल्या एसआयटी चौकशीतून व पोलीस कारवाईतून लवकरच सत्य बाहेर येईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर घोटाळा, कारवाईचे आदेश

राम मंदिरातील चोरीचे प्रकरण गाजत असतानाच आता बद्रीनाथ-केदारनाथ मंदिरातील घोटाळय़ाचे प्रकरण चिघळले आहे. याप्रकरणी उत्तराखंड सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. केदारनाथला भेट देणाऱ्या व्हीआयपी पाहुण्यांचे राहणे, खाणे आणि इतर खर्चासाठी मंदिराच्या निधीतून कोणत्याही परवानगीशिवाय पैसे देण्यात आल्याचे समोर आले आहे. त्याचे प्रथमदर्शनी पुरावे समोर आल्यानंतर सरकारने मंदिर समितीच्या सीईओंना चौकशीचे निर्देश दिले आहेत.

अयोध्येत दिवसाला एक ते सवा लाख भाविक येत असत. आता ही संख्या 60 हजारांवर आली आहे.

एरवी भाविकांना दर्शनासाठी चार-चार तास लागत. गर्दी नसल्यामुळे आता एका तासात दर्शन होते.

हॉटेल बुकिंग 25 टक्क्यांपर्यंत कमी झाले.

दुकानदारांची कमाई पाच हजारांवरून एक हजारावर तर हारवाल्यांचा धंदा दीड हजारावरून 500 रुपयांवर आला.

ई-रिक्षा चालवणारे म्हणतात, खर्च निघणेही कठीण.

मंदिराला भाजपसंघाचे कार्यालय बनवले ः शंकराचार्य

‘सध्याचे राम मंदिर आरएसएस-भाजपचे कार्यालय झाले आहे. ते खऱ्या अर्थाने मंदिर होईल तेव्हाच मी तिथे भेट देईन, असे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले. ‘मंदिरातील चोरीवर सध्या लोक प्रश्न उपस्थित करत आहेत हे चांगले आहे, मात्र समोरच्या बाजूने केवळ मलमपट्टी सुरू आहे. ट्रस्टही सरकारचा, एसआयटीही सरकारचीच आहे. एकाच घरातले लोक चोर-पोलीस खेळत आहेत. चोरही तेच आणि पोलीसही तेच असा प्रकार आहे. यातून काय निर्णय होणार?,’ असा प्रश्नही त्यांनी केला. सुरुवातीला चंपत राय जे खोटे बोललेत, ते देशाने ऐकले आहे. आता ते जे काही बोलत आहेत ती केवळ पश्चातबुद्धी आहे. त्याला काहीही अर्थ नाही,’ असे त्यांनी सुनावले.