
नांदेड शहरातील श्री गुरू गोविंदसिंहजी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाचा भराव ढासळल्याने खळबळ उडाली. यानंतर संबंधित एजन्सीने मलबा हटवत, पुलावर सिमेंटने डागडुजी करून भेगा बुजविल्या. या पुलाची पाहणी करण्यासाठी रविवारी राजधानी दिल्लीहून भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाची (NHAI) चार सदस्यीय केंद्रीय चौकशी समिती दाखल झाली. समितीने केटीआयएल (KTIL) कंपनीच्या निकृष्ट दर्जाच्या कामावर ताशेरे ओढले असून, बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याचे नमुने जप्त केले आहेत. या प्रकरणी सविस्तर अहवाल लवकरच सादर केला जाणार आहे.
केंद्रीय समितीने उड्डाणपुलावरील भराव, मुरूम, गॅबियन नेट, बांधकाम साहित्य तसेच इतर तांत्रिक बाबींची बारकाईने तपासणी केली. पाहणीदरम्यान वापरण्यात आलेले साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. यावेळी समितीच्या सदस्यांनी संबंधित कंत्राटदार ‘केटीआयएल’ कंपनीचे प्रोजेक्ट डायरेक्टर, साईट सुपरवायझर आणि व्यवस्थापनाची चांगलीच खरडपट्टी काढली.
मुरमाऐवजी वापरली माती
केंद्रीय समितीने अनेक गंभीर त्रुटी समोर आणल्या आहेत. समितीने उड्डाणपुलावरील रस्त्यावर पडलेल्या मोठ्या भेगा, दोन गॅपमधील वाढलेले अंतर, दबलेला रस्ता तसेच पावसाचे पाणी बाहेर जाणारे सर्व आऊटलेट्स बंद असल्याचे निरीक्षण नोंदविले. भरावामध्ये अपेक्षित दर्जाच्या मुरमाऐवजी मातीचे प्रमाण अधिक असल्याने पाणी आत झिरपल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.




























































